पुणे
pune municipal corporation सामान्य पुणेकरांकडून मिळकतकर आणि पाणीपट्टीची दमडी-दमडी वसूल करण्यासाठी जप्तीची कारवाई करणारी पुणे महापालिका स्वतःच्या मालमत्तांचे भाडे वसूल करण्यात मात्र पूर्णपणे अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या मालकीच्या सदनिका, इमारती आणि मोकळ्या जागांच्या भाड्यापोटी तब्बल ३५ कोटी ४४ लाख २८ हजार ६१० रुपयांची थकबाकी असल्याची माहिती अधिकृत उत्तरातून उघड झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या महसूल व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक देवेंद्र वडके यांनी मालमत्ता विभागाच्या कारभारासंदर्भात आणि थकीत भाड्याविषयी लेखी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेच्या मालकीच्या एकूण १ हजार १३२ सदनिका, २६३ इमारती आणि १ हजार ५५२ मोकळ्या जागा विविध व्यक्ती, संस्था आणि व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. मात्र, या मालमत्तांचे भाडे वेळेत वसूल करण्यात प्रशासनाला मोठे अपयश आले आहे.
एकूण थकबाकीमध्ये सर्वाधिक वाटा हा मोकळ्या जागा आणि जमिनींच्या भाड्याचा आहे. महापालिकेच्या १ हजार २१३ जमिनींच्या भाड्यापोटी तब्बल २४ कोटी ९९ लाख १० हजार १६३ रुपये थकीत आहेत. अनेकांनी महापालिकेच्या मोक्याच्या जागांचा व्यावसायिक वापर करून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळविले, मात्र त्याचे भाडे महापालिकेकडे जमा केले नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सदनिका आणि इमारतींच्या भाड्याची थकबाकीही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.
महापालिकेकडून थकबाकीदार नागरिकांवर कर वसुलीसाठी जप्ती, नोटिसा आणि अन्य कठोर उपाययोजना केल्या जातात. मात्र, स्वतःच्या मालमत्तांचे भाडे थकविणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने दुटप्पी धोरणाचा आरोप होत आहे. वेळेत भाडे वसूल न झाल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होत असून, विकासकामांसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आता या ३५ कोटींहून अधिक रुपयांच्या थकीत भाड्याची प्रत्यक्षात किती वसुली होणार, संबंधित थकबाकीदारांवर करार रद्द करणे, मालमत्ता ताब्यात घेणे किंवा अन्य कायदेशीर कारवाई केली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. महसुली शिस्तीबाबत मोठमोठे दावे करणाऱ्या महापालिका प्रशासनाने स्वतःच्या मालमत्तांवरील थकबाकी वसूल करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या मालमत्ता
- एकूण सदनिका १,१३२
- एकूण इमारती २६३
- एकूण मोकळ्या जागा १,५५२
थकबाकीची विभागणी आणि आकडेवारी
मालमत्तेचा प्रकार - थकबाकीदार मालमत्ता - थकीत भाडे रक्कम (रुपये)
- सदनिका - ९९९ सदनिका - ६ कोटी ५१ लाख २७ हजार ५२
- इमारती - १९३ इमारती - ३ कोटी ९३ लाख १० हजार ५९५
- मोकळ्या जागा - १,२१३ जागा - २४ कोटी ९९ लाख १० हजार १६३
- एकूण थकीत भाडे- २,४०५ मालमत्ता - ३५ कोटी ४३ लाख ४७ हजार ८१०