जखमी अवस्थेत सापडली दुर्मिळ ‘उडणारी खार’

वन विभागाच्या तत्परतेने वाचले प्राण, चिचगड-ककोडी मार्गावरील घटना

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
गोंदिया
rare-flying-squirrell जिल्ह्यातील एनएनटीआरच्या जंगलात दुर्मिळ उडणार्या खारूताईचे अस्तित्व असून देवरी तालुक्यातील चिचगड-ककोडी मार्गावर अशीच एक दुर्मिळ प्रजातीची उडणारी खार (फ्लाइंग स्क्विरल) जखमी अवस्थेत आढळून आल्याची घटना गुरुवारी घडली. वन्यजीवप्रेमी महेश रहांगडाले यांच्या सतर्कतेमुळे आणि वन विभागाच्या तातडीच्या बचाव मोहिमेमुळे या दुर्मिळ वन्यजीवाचे प्राण वाचले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे.
 
gondia photo1
 
rare-flying-squirrel मिळालेल्या माहितीनुसार महेश रहांगडाले हे चिचगड-ककोडी मार्गाने जात असताना रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेली एक खार त्यांच्या नजरेस पडली. जवळ जाऊन पाहणी केली असता ती सामान्य खार नसून दुर्मिळ प्रजातीची उडणारी खार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ वनरक्षक लोकेश टेंभरे व सुरेश रहांगडाले यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. सूचना मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी उडणार्या खारीचे सुरक्षितरीत्या रेस्क्यू करून तिला उपचारासाठी वन विभागाच्या ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, चिचगड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बी. वाडे यांनी उडणार्या खारीवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असून ती पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याचे सांगत नागरिकांनी कोणताही दुर्मिळ वन्यजीव जखमी अथवा संकटात आढळल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.
 
 
शिकार व तस्करीस कठोर शिक्षेची तरतूद
rare-flying-squirrel वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत उडणारी खार व विशाल खार या संरक्षित वन्यजीवांच्या यादीत समाविष्ट आहेत. या वन्यजीवांची शिकार करणे, बेकायदेशीर ताब्यात ठेवणे, पाळणे, त्यांना इजा पोहोचविणे अथवा तस्करी करणे हा गंभीर गुन्हा असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.