वॉशिंग्टन,
romeo enters indias fleet भारतीय नौदलाला आणखी एक आधुनिक एमएच-६० आर सीहॉक हेलिकॉप्टर मिळाले आहे. हे लॉकहीड मार्टिनच्या ‘रोमिओ’ हेलिकॉप्टरमध्ये पाणबुड्यांचा वेध घेण्याची क्षमता आहे. या आठवड्यात आणखी दोन हेलिकॉप्टर्स भारतात दाखल होत असून, त्यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत होत असलेल्या संरक्षण संबंधांना नवी चालना मिळाली आहे. भारतीय नौदलाला आणखी एक आधुनिक एमएच-६० आर सीहॉक हेलिकॉप्टर मिळाले आहे. गेल्या आठवड्यात कोची येथे ते नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. अमेरिकेने या सुपुर्दगीचे वर्णन दोन्ही देशांच्या आणि भारत-प्रशांत क्षेत्राच्या सागरी सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असे केले आहे. एक हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले असून, आणखी दोन सीहॉक हेलिकॉप्टर्स या आठवड्यात दाखल होणार आहेत. अमेरिका मध्य-पूर्वेत इराणसोबत भीषण युद्धात गुंतलेला असताना हे हेलिकॉप्टर सोपवले जात आहेत,असे भारतातील अमेरिकी दूतावासाने सांगितले.
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी याला दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारीसाठी ‘उत्तम बातमी’ म्हटले आहे. ते म्हणाले की, हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर मुक्त आणि खुल्या भारत-प्रशांतसाठी असलेल्या आपल्या सामायिक वचनबद्धतेला अधिक मजबूत करेल. ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स अमेरिकेची आघाडीची संरक्षण कंपनी लॉकहीड मार्टिनद्वारे तयार केली जातात, असे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले.
सीहॉक इतके खास का आहे?
हे बहुउद्देशीय हेलिकॉप्टर जगभरात ‘रोमिओ’ म्हणूनही ओळखले जाते. हे प्रामुख्याने युद्धनौका, विमानवाहू जहाजे आणि फ्रिगेट्सवरून उड्डाण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे हेलिकॉप्टर एजीएम-११४ हेलफायर हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, एमके-५४ हलके टॉर्पेडो आणि आधुनिक मशीनगनने पूर्णपणे सुसज्ज आहे.
पाणबुड्यांचे युग
हे डिपिंग सोनार, सोनोबॉय आणि मल्टी-मोड रडार यासारख्या प्रगत प्रणालींनी सुसज्ज आहे, ज्यामुळे लपून राहून शत्रूच्या पाणबुड्यांचा सहजपणे मागोवा घेता येतो. माजी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या मते, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ही हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली होती, जिथे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आपली उपयुक्तता सिद्ध केली. लढाऊ कार्याव्यतिरिक्त, या हेलिकॉप्टर्सचा वापर निगराणी, शोध आणि बचाव कार्ये, तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठीही केला जातो.