शशी थरूर यांची अग्निशमन दलाच्या तत्परतेने 15 मिनिटांत सुटका

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
मुंबई
shashi tharoor काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ नेते शशी थरूर शुक्रवारी संध्याकाळी तिरुअनंतपुरम येथील एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये अडकले. या घटनेमुळे काही काळ हॉटेल परिसरात खळबळ उडाली होती. हॉटेल कर्मचारी आणि लिफ्ट मॅकनिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि त्यांच्या तत्परतेमुळे थरूर यांच्यासह लिफ्टमध्ये अडकलेल्या इतरांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
 

shashi tharoor stuck in hotel lift in thiruvananthapuram rescued after 15 minutes 
शशी थरूर हे रोटरी क्लब ऑफ त्रिवेंद्रम ईस्टच्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये आले होते. त्याचवेळी लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती अचानक बंद पडली. सुमारे 15 मिनिटांहून अधिक काळ थरूर आणि त्यांच्यासोबत असलेली मंडळी लिफ्टमध्ये अडकून पडली होती.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 7 वाजून 37 मिनिटांनी या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. दरम्यान, हॉटेल कर्मचारी आणि काही व्यक्ती रॉडच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य समोर आले होते. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट अर्ध्यातच अडकली होती आणि तिचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला होता. लिफ्ट मॅकनिकनेही ती सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेत हायड्रोलिक स्प्रेडरच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतला.अखेर संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी हायड्रोलिक स्प्रेडरच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला. दरवाजा उघडल्यानंतर शशी थरूर हसतमुखाने बाहेर आले. त्यांनी सुटका करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसह हॉटेल कर्मचारी आणि मॅकनिकांचे आभार मानले.
“आपले सर्वांचे खूप खूप आभार. आपण सर्वांनी चांगले काम केले,” असे म्हणत थरूर यांनी उपस्थितांचे कौतुक केले. त्यांनी यावेळी आपल्यासह इतर कोणालाही इजा झाली नसल्याचे सांगितले. तसेच बचाव कार्यात सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना चहासाठी निमंत्रणही दिले.
या घटनेनंतर काही वेळ हॉटेलमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे सर्वांची सुखरूप सुटका झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.