भारताच्या यशाला सिंगापूरचा सलाम

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
singapore salutes indias success भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्राने नवा इतिहास रचत स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-१ या रॉकेटचे पहिले कक्षीय उड्डाण यशस्वी केले आहे. या यशानंतर भारताला जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वोंग यांनीही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. भारताने सिंगापूरसारख्या छोट्या देशालाही अंतराळात आणि त्याही पुढे नेले असल्याचे सांगत त्यांनी इस्रो, इन-स्पेस आणि स्कायरूटच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले.
 
singapore salutes indias success
 
सिंगापूर उच्चायुक्तालयाने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विक्रम-१च्या यशाबद्दल संदेश प्रसिद्ध केला. त्यामध्ये "वंदे मातरम! इतिहास घडला आहे. स्कायरूट एरोस्पेसचे विक्रम-१ कक्षेत पोहोचले आहे," असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सायमन वोंग यांनी या ऐतिहासिक क्षणी आपण भावूक झाल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी स्कायरूट एरोस्पेसचे सहसंस्थापक नागा भरत डाका यांच्याशी संवाद साधत संपूर्ण टीमचे अभिनंदनही केले.
 
शनिवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून (SDSC-SHAR) विक्रम-१चे पहिले कक्षीय उड्डाण पार पडले. 'मिशन आगमन' असे नाव देण्यात आलेल्या या मोहिमेत रॉकेटने पृथ्वीच्या निम्न कक्षेत अनेक तांत्रिक पेलोड यशस्वीरित्या पोहोचवले. प्रक्षेपणापूर्वी तांत्रिक कारणामुळे काही काळ विलंब झाला होता. मात्र त्यानंतर रॉकेटने चारही टप्प्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात उपग्रह नियोजित कक्षेत स्थापित केला. यासह स्वतः विकसित केलेले कक्षीय रॉकेट तयार करून यशस्वी प्रक्षेपण करणाऱ्या जगातील मोजक्या खाजगी कंपन्यांमध्ये स्कायरूट एरोस्पेसचा समावेश झाला आहे.
 
या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरूटच्या टीमशी दूरध्वनीवर संवाद साधून अभिनंदन केले. पहिल्याच प्रयत्नात मिळालेले हे यश भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले. विक्रम-१चे यश आत्मनिर्भर भारत अभियानाचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
पूर्णपणे कार्बन-कंपोझिट मटेरियलपासून तयार करण्यात आलेल्या विक्रम-१मध्ये ३५० किलो वजनाचा पेलोड पृथ्वीच्या निम्न कक्षेत पोहोचवण्याची क्षमता आहे. या रॉकेटमध्ये स्कायरूटने विकसित केलेली अत्याधुनिक प्रणोदन प्रणाली, उच्च कार्यक्षमतेची सॉलिड मोटर आणि ३डी-प्रिंटेड इंजिन वापरण्यात आले आहे. या उड्डाणात स्कायरूटच्या SCOPE प्रयोगासह ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्व्ह आणि डी-क्यूब यांच्या तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांचाही समावेश होता. या मोहिमेद्वारे काही विशेष स्मृतिचिन्हेही अंतराळात पाठवण्यात आली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'वंदे मातरम' संदेश असलेले हस्तलिखित पोस्टकार्ड, इस्रोचे विद्यमान व माजी अध्यक्ष, भारतीय अंतराळवीर, कंपनीचे कर्मचारी, गुंतवणूकदार आणि जगभरातील समर्थकांचे संदेश यांचा समावेश होता.
 
२०१८ मध्ये इस्रोचे माजी शास्त्रज्ञ पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका यांनी स्कायरूट एरोस्पेसची स्थापना केली होती. अंतराळ मोहिमा अधिक परवडणाऱ्या आणि सर्वांसाठी सुलभ करण्याचे उद्दिष्ट घेऊन सुरू झालेल्या या कंपनीने २०२२ मध्ये विक्रम-एस या भारतातील पहिल्या खाजगी बनावटीच्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. आता विक्रम-१च्या यशामुळे भारताच्या खाजगी अंतराळ उद्योगाला नवी दिशा मिळाली असून, या मोहिमेतून मिळालेल्या टेलिमेट्री डेटाच्या आधारे कंपनी भविष्यात नियमित व्यावसायिक प्रक्षेपण सेवा सुरू करण्याच्या तयारीला गती देणार आहे.