नागपूर,
six deer killed जिल्ह्यातील कन्हान भागात शनिवार, १८ जुलै रोजी पहाटे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. कन्हान रेल्वे स्थानकाजवळील तुकाराम नगर परिसरात पहाटे ४ ते ५ च्या सुमारास एका भरधाव रेल्वेगाडीने हरणांच्या कळपाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तब्बल ६ हरणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हरणांचा हा कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना समोरून आलेल्या वेगवान ट्रेनने त्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की सहा निष्पाप प्राण्यांचे प्राण जागीच गेले. रेल्वेच्या धडकेत एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने वन्यप्राणी दगावण्याची ही पहिलीच घटना असल्याने वनविभाग आणि रेल्वे प्रशासन हादरले आहे.
यापूर्वी नागपूर शहरात राष्ट्रीय महामार्ग ४४ वर वाहनांच्या धडकेत वाघ, बिबट्या आणि इतर वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. महामार्गांवर वन्यजीवांसाठी अंडरपाससारखे उपाय केले गेले असले, तरी रेल्वे रुळांवरील प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे रेल्वे मार्गांवरील 'मिटिगेशन मेजर्स' बद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत हरणांचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेली ट्रेन आणि हरणांची नेमकी प्रजाती याबाबत वनविभागाकडून अधिकृत माहिती येणे अद्याप बाकी आहे.