मुंबई
subodh bhave अभिनेता सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि सई ताम्हणकर यांचा ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सनई चौघडे’ या चित्रपटानंतर हे तिघे पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. ‘बोल बोल राणी’च्या निमित्ताने तिघांनीही ‘सनई चौघडे’च्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सुबोध भावे यांनी या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी घडलेला एक रंजक किस्सा सांगितला. या चित्रपटाच्या शूटिंगआधी अभिनेता श्रेयस तळपदेने त्यांना रात्री घरी बोलावून चांगलेच सुनावले होते.
एका मुलाखतीत सुबोध भावेने सांगितले की, श्रेयस तळपदे हा त्याचा जवळचा मित्र असून, त्याच्या विश्वासामुळेच ‘सनई चौघडे’ हा चित्रपट साकारला. या चित्रपटाच्या मुहूर्तावेळी घडलेला प्रसंग फार कमी लोकांना माहिती असल्याचेही त्याने सांगितले.
सुबोध म्हणाला, “सुभाष घई आणि तत्कालीन सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ‘सनई चौघडे’चा मुहूर्त झाला होता. त्या मुहूर्ताला मी गेलो होतो. मात्र, त्यावेळी मी अत्यंत ढगळा शर्ट घालून गेलो होतो.”
मुहूर्ताचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री सुबोध भावेचे ‘सखी’ या चित्रपटाचे शूटिंग फिल्मसिटीत सुरू होते. त्याचवेळी अचानक राजीव पाटील आणि पुष्पांग गावडे हे दोघे कोणतीही कल्पना नसताना तिथे आले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून काहीतरी गडबड असल्याचे सुबोधला जाणवले.
सुबोधने पुढे सांगितले, “ब्रेकमध्ये मी त्यांना बाजूला घेतले. त्यांनी मला सांगितले की, पॅकअप झाल्यानंतर तुला श्रेयसने घरी बोलावले आहे. त्यानंतर मी रात्री साडेअकरा-बारा वाजता श्रेयसच्या घरी गेलो.”
श्रेयस तळपदेने त्यावेळी सुबोधला विचारले, “तुला काय अक्कल आहे का? कसा येतोस तू मुहूर्ताला?” यावर सुबोधने काय झाले, असे विचारले असता श्रेयसने त्याच्या ढगळ शर्टवर नाराजी व्यक्त केली.
सुबोधने सांगितले, “तो म्हणाला, असा ढगळ शर्ट घालून कोण येतं मुहूर्ताला? मी म्हटलं, पण यात प्रॉब्लेम काय आहे?”
यानंतर श्रेयसने सांगितले की, मुहूर्तावेळी सुबोधला पाहून सुभाष घई यांनी त्याच्या शरीरयष्टीवर प्रश्न उपस्थित केला होता. सुबोधच्या म्हणण्यानुसार, श्रेयसने त्याला सांगितले, “सुभाष घईंनी तुला पहिल्यांदा बघितलं आणि त्यांनी म्हटलं की, ‘मेरे फिल्म का हिरो शरीर से इतना बडा नही हो सकता, ये कितना जाडा है, इसको निकालो.’”
मात्र, श्रेयस तळपदेने सुभाष घई यांना समजावून सांगितले की, सुबोधच या भूमिकेसाठी योग्य आहे. सुबोध म्हणाला, “श्रेयस म्हणाला, मी त्यांना समजावलं की नाही नाही, हाच करणार. त्याने सांगितलं की शूटिंगला आता फक्त २० दिवस राहिले आहेत. त्याने मला डाएट आणि व्यायाम करण्यास सांगितले.”
यानंतर श्रेयसने दुसऱ्या दिवशी सुबोधचे मार्गदर्शन केले आणि पुढील २० दिवस त्याच्याकडून कठोर तयारी करून घेतली. “सनई चौघडेमध्ये मी जे काही दिसलो आहे, ते फक्त श्रेयसमुळे,” असे सुबोधने सांगितले.
या अनुभवाबद्दल बोलताना सुबोधने सांगितले की, त्या काळात कलाकारांसाठी शरीरयष्टी किंवा लूक याकडे विशेष लक्ष दिले जात नव्हते. तो म्हणाला, “तेव्हा आमचे कधीच बॉडीबिल्डर आदर्श नव्हते. आमचे आदर्श कायम शरीराने वाढलेले पण अभिनय उत्तम करणारे कलाकार होते. त्यामुळे शरीराचं आणि लुकचंही महत्त्व असतं, ही गोष्ट डोक्यात नव्हती. पण ‘सनई चौघडे’च्या निमित्ताने ती गोष्ट समजली.”