भारतीय रेल्वेत आता हायड्रोजन युग

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
 दिल्ली अग्रलेख
hydrogen era देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण झाले आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. इंधनाच्या क्षेत्रात एक नवी क्रांतीही झाली, असे म्हणावे लागेल. हरयाणातील जिंद रेल्वे स्थानकातून सोनिपतला रवाना झालेल्या या गाडीने भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासात एका नवे सोनेरी पान जोडले गेले. सुवर्णाक्षरांनी नोंद करावी, अशी ही घटना. हायड्रोजनवर धावणारी देशातील पहिली गाडी पर्यावरणानुकूल आणि स्वच्छ भारताचे प्रतीकही आहे.
 
 
hydrogen era
 
 
हायड्रोजन गाडीमुळे चीन, फ्रान्स आणि जर्मनी या जगातील तीन विकसित देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. सध्या या तीनच देशांत हायड्रोजनवरील गाड्या धावत आहेत. जे तंत्रज्ञान अजूनपर्यंत ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्ये वापरले गेलेले नाही, ते भारतात आले, ही तमाम भारतीयांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. देशात एकेकाळी कोळशावर रेल्वेगाड्या धावत होत्या. काळा-काळा धूर हवेत सोडणाऱ्या या गाड्या प्रवाशांची गरज भागवत असल्या, तरी त्यांचा चेहरा आणि कपडे काळे करायलाही मागेपुढे पाहत नव्हत्या. पर्यावरणाचे जे नुकसान व्हायचे ते वेगळेच. लहान मुलांना मामाच्या गावाला जाण्यासाठी रेल्वे ही वाहतुकीचा स्वस्त आणि मस्त पर्याय होता. त्यातूनच ‘झुकझुक झुकझुक अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहु या, मामाच्या गावाला जाऊ या’ या त्या काळी गाजलेल्या लोकप्रिय गीताने अनेकांचे बालपण समृद्ध आणि आनंदी केले होते. त्यानंतर भारतीय रेल्वेत डिझेल इंजिनचे युग सुरू झाले. कालांतराने रेल्वे विद्युत इंजिनावर धावू लागली आणि आता हायड्रोजनवर भारतीय रेल्वे धावू लागली आहे. रेल्वेची ही प्रगती सर्वांनाच थक्क करणारी म्हणावी लागेल.
रेल्वे हे देशातील प्रवासाचे सर्वांत स्वस्त, मस्त आणि आनंददायी साधन आहे. रेल्वेचा प्रवास हा नेहमीच सानथोरांसाठी आनंददायी राहिला आहे. भारतीयांची प्रवासासाठीची पहिली पसंती ही आजही रेल्वेच आहे. त्यामुळे वर्षभर सर्व रेल्वेगाड्या भरभरून धावत असतात. अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी तीन-चारशेपर्यंत जात असते. रेल्वेने प्रवास केला नसेल, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. इंग्रजांनी रेल्वे भारतात आणली असली तरी नंतर भारतीयांनी या रेल्वेचे जे अत्याधुनिकीकरण केले, ते सर्वांची मान आनंदाने आणि अभिमानाने उंचावी असे आहे. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने देशवासीयांना बुलेट ट्रेनचे नुसते स्वप्नच दाखवले नाही तर ते प्रत्यक्षात येण्याच्या जवळ पोहोचले आहे. १५ ऑगस्ट २०२७ ला बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच केली आहे.
आखाती युद्धामुळे जगात इंधनाचे कधी नव्हे ते गंभीर असे संकट उद्भवले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली, त्यांच्या किमती वाढल्या. भारताला पेट्रोल आणि इंधन आयात करावे लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्ची पडते. पेट्रोलची आयात कमी व्हावी आणि परकीय चलनाची बचत व्हावी म्हणून पेट्रोलमध्ये टप्प्याटप्प्याने इथेनॉल मिसळण्याचा प्रयोग सुरू झाला; तो यशस्वीही झाला. इंधनाच्या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्याचा विडा विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी उचलला आहे. त्यातून पर्यायी इंधनाचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. या शोधाची परिणती म्हणजेच सीएनजी आणि विजेवर चालणाऱ्या गाड्यांचे युग भारतात सुरू झाले. त्यात आता हायड्रोजन या इंधनाची भर पडली आहे. विजेवर धावणाऱ्या गाड्यांना ओव्हरहेड वायरमधून विजेचा पुरवठा केला जातो. हायड्रोजनवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनची रासायनिक अभिक्रिया होऊन विद्युत निर्मिती होते.hydrogen era कोळशावर आणि डिझेलवर चालणारी इंजिने ज्याप्रमाणे स्वत:च ऊर्जा निर्मिती करीत असतात, त्याप्रमाणे हायड्रोजनवर चालणारी इंजिनेही ऊर्जा निर्मिती करणार आहे.
देशाला आज स्वच्छ आणि पर्यावरणानुकूल इंधनाची गरज आहे, जी हायड्रोजनमुळे पूर्ण होणार आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या चारचाकी गाड्या आधीच बाजारात आला आल्या आहेत. पर्यायी इंधनाचा आग्रही आणि सातत्याने पुरस्कार करणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी स्वतः या गाड्या वापरतात हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. पर्यायी इंधनाचा शोध घेणे ही काळाची गरज असली, तरी तशा गाड्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडतील, अशा दरात उपलब्ध झाल्या पाहिजेत.
रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून भारतीय रेल्वेचा कायाकल्प करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोडला आहे. वैष्णव हे मूळचे सनदी अधिकारी असल्यामुळे त्यांना प्रशासन कसे चालते, याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेला फक्त गतिमानच नाही तर अत्याधुनिक करण्याचा विडा वैष्णव यांनी उचलला आहे. रेल्वेची गतिमानता, कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी आणि तिला अत्याधुनिक बनवण्यासाठी वर्षभरात ५२ महत्त्वाकांक्षी सुधारणा करण्याची घोषणा वैष्णव यांनी केली आहे. दोन टप्प्यांत मिळून आतापर्यंत १७ सुधारणा कार्यान्वितही झाल्या आहेत. ‘वंदे भारत’ आणि ‘अमृत भारत’ गाड्या धावू लागल्या आहेत. २०१४ च्या आधीचा रेल्वे प्रवास आणि सध्याचा रेल्वे प्रवास यातील फरक सगळ्यांनाच जाणवू लागला आहे. गाड्या वेळेवर धावू लागल्या. स्वच्छता प्रवाशांना भावू लागली. रेल्वेस्थानकातील सुविधांत वाढ झाली. अनेक रेल्वेस्थानके तर विमानतळांनाही लाजवू लागली. सरकार दूरदृष्टीचा आणि विकासाचे महत्त्व समजणारे असले तर काय होऊ शकते, हे मोदींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. सरकारने देशातील रेल्वेचा चेहरामोहरा बदलून टाकला. जिंद ते सोनिपत हे ९० किमीचे अंतर कापणाऱ्या या हायड्रोजन गाडीला १० डबे राहणार असून यातील ८ प्रवासी डबे तर २ पॉवर कार आहेत. या गाडीत तयार करण्यात आलेल्या विशेष प्रकारच्या टाक्यांत हायड्रोजन वायू (गॅस) भरला जाईल. जिंद येथे हायड्रोजन गॅस तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.hydrogen era याठिकाणी विजेचे पाण्यासोबत इलेक्ट्रोलिसिस करून हायड्रोजन गॅस तयार केला जाईल. नंतर हायड्रोजनला फ्युल सेल नामक उपकरणाच्या माध्यमातून ऑक्सिजनसोबत मिळवून वीज निर्मिती केली जाईल. वीज इंजिनाच्या मोटारपर्यंत पोहोचून ही गाडी धावणार आहे. यातून धूर म्हणजे कार्बन डायऑक्साईड निघणार नाही. फक्त वाफ आणि उष्णता बाहेर पडेल, त्यामुळे सभोवतालच्या वातावरणात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत या गाडीतून शून्य उत्सर्जन होणार आहे. त्यामुळे तापमानात वाढ होणार नाही. हायड्रोजनवर धावणारी ही गाडी म्हणजे मानवी बुद्धी आणि विज्ञानाचा एकत्रित चमत्कारच म्हणावा लागेल. ‘मोदी है तो मुमकिन है’ असे उगीच म्हटले जात नाही. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असे म्हटले जात होते; त्याच धर्तीवर ‘जे न करे कोई, वो करे मोदी’ असे म्हणायला हरकत नाही. येत्या काळात देशातील अनेक मार्गांवर हायड्रोजन गाड्या धावायला सुरुवात झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. वंदे भारत गाड्यांनी देशातील लोकांचे मन जिंकले आहे. परिणामी वंदे भारत गाड्यांची मागणी आणि लोकप्रियता वाढली आहे. उद्या अशीच लोकप्रियता हायड्रोजनवर धावणाऱ्या गाड्यांनाही लाभणार आहे. तो दिवसही फार दूर नाही. रेल्वे क्षेत्रात देशाला हायड्रोजन युगात नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समस्त सहकाऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजे.