मुंबई
the odyssey movie होमर नावाचा व्यक्ती प्रत्यक्षात कधी अस्तित्वात होता की नाही, यावर आजही इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. होमरनेच ‘ओडिसी’ हे महाकाव्य लिहिले की नाही, याचाही ठोस पुरावा उपलब्ध नाही. मात्र, जगप्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी याच अमर महाकाव्यावर आधारित ‘द ओडिसी’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला असून, तो अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या लोकप्रिय मीममधील ‘दिस इज सिनेमा!’ ही भावना मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
प्राचीन ग्रीसमधील सर्वांत मोठ्या पौराणिक कथांपैकी एक असलेल्या ‘ओडिसी’ची तुलना नेहमीच भारतीय महाकाव्य ‘महाभारता’शी केली जाते. ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’मध्ये ट्रोजन वॉरनंतर ग्रीसमधील महान योद्धा ओडिसियसच्या (मॅट डेमन) घरवापसीचा प्रवास केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे.
महाकाव्याला साजेशी भव्य दृश्ये, त्या दृश्यांना एका अद्भुत अनुभवात रूपांतरित करणारे संगीत आणि पात्रांच्या संवादांना तत्त्वज्ञानाची उंची देणारे डायलॉग्स यांच्या जोरावर नोलन यांनी अशी कथा उभी केली आहे, जी जवळपास २ तास ५२ मिनिटे प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते.
ही कथा केवळ ओडिसियसची नाही, तर त्याची पत्नी पेनेलोपी (अॅन हॅथवे) हिचीही आहे. दशकभरापासून ती आपल्या पतीच्या परतीची वाट पाहत आहे. मात्र, दुसरीकडे तिच्या महालात दररोज तिच्याशी विवाह करण्याची इच्छा असलेल्या पुरुषांची गर्दी होत असते. ही कथा ओडिसियसचा मुलगा टेलेमेकस (टॉम हॉलँड) याचीही आहे. स्वत:ला सक्षम युवराज म्हणून सिद्ध करण्यासाठी तो संघर्ष करत असतो, पण त्याच वेळी वडिलांच्या आदर्शांवर ठाम राहण्याची जबाबदारीही त्याच्यासमोर असते. ज्या वडिलांच्या जिवंत परतण्याची आता कोणालाही अपेक्षा राहिलेली नाही, त्यांच्या वारशाशी तो झगडत असतो.
ओडिसियस परतणार का? परतला, तरी तो ट्रोजन वॉरमध्ये अशक्य वाटणारा विजय मिळवण्यासाठी गेलेला तोच योद्धा असेल का? त्याच्या परतीनंतर इथाका हे त्याचे राज्य पूर्वीसारखे राहील का? ही कथा केवळ एका योद्ध्याच्या घरवापसीची आहे की युद्धाच्या राखेतून नव्या आयुष्याचा शोध घेणाऱ्या व्यक्तीची, याची उत्तरे चित्रपटात मिळतात. मात्र, यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे नोलन यांचा हा चित्रपट त्या शेकडो शूर योद्ध्यांची कथा सांगतो, जे ओडिसियससोबत ट्रोजन वॉरमध्ये सहभागी झाले होते.
‘ओडिसी’ हे समुद्राएवढे विशाल महाकाव्य आहे. त्यामुळे या कथेला पडद्यावर साकारताना नोलन कितपत यशस्वी होतील, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता होती. मात्र, नोलन यांनी ट्रोजन वॉरलाच केंद्रस्थानी न ठेवता ओडिसियसच्या घरवापसीच्या प्रवासावर आणि त्या प्रवासातून त्याला मिळालेल्या अनुभवांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नोलन यांच्या शैलीतील युद्धदृश्यांची अपेक्षा करणाऱ्या प्रेक्षकांची काहीशी निराशा होऊ शकते.
ओडिसियससाठी हा प्रवास एका नव्या दृष्टिकोनासारखा ठरतो. या प्रवासातून तो आयुष्य, माणसं आणि माणुसकी यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकतो. त्याच्या मार्गात त्याच्या सैन्याचा सामना राक्षस, विशालकाय मानव, मायावी जादूगार आणि खवळलेल्या भयानक समुद्राशी होतो. हा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांसाठी भव्य आणि अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरतो.
चित्रपटाच्या पटकथेबद्दल बोलायचे झाल्यास, सुरुवातीला कथा काहीशी संथ गतीने पुढे जाते. मात्र, त्यात कुठेही कंटाळवाणेपणा जाणवत नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेचे आणि कथानकाचे पदर हळूहळू उलगडत जातात आणि अचानक एखादा प्रसंग उत्सुकता वाढवत पुढील घटनांची प्रतीक्षा निर्माण करतो.
चित्रपटातील प्रेम, राजकारण, सत्ता, निसर्ग आणि पुरुषांच्या शौर्यावर आधारित संवाद हे अनेकदा तत्त्वज्ञानासारखे वाटतात. ट्रोजन वॉर हा मुख्य विषय नसला, तरी ओडिसियसच्या कथेसाठी आवश्यक तेवढा संदर्भ योग्य प्रकारे मांडण्यात आला आहे.
होयटे व्हॅन होयटेमा यांची सिनेमॅटोग्राफी प्रेक्षकांना जणू टाइम मशीनमधून त्या काळात घेऊन जाते. चित्रपट पाहताना आपण त्या जगात प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा भास निर्माण होतो. लुडविग गोरान्सन यांचे संगीत दृश्यांच्या भावविश्वाशी प्रेक्षकांना जोडून ठेवते. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रॉडक्शन डिझाइनमुळे ‘द ओडिसी’ची पौराणिक बाजू अधिक भव्य आणि ‘लार्जर दॅन लाइफ’ अनुभवात बदलते.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास, ओडिसियसच्या भूमिकेतील मॅट डेमन यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या अभिनयातून साकारलेला ओडिसियस प्रेक्षकांच्या मनात कधी सहानुभूती, कधी खंत तर कधी आदराची भावना निर्माण करतो.
हेलेन ऑफ ट्रॉयच्या भूमिकेसाठी लुपिता न्यॉन्गो यांच्या निवडीवर यापूर्वी मोठी टीका झाली होती. ही टीका त्यांच्या रंगावरून करण्यात आली होती. मात्र, त्या चर्चांपेक्षा त्यांच्या अभिनयाकडे पाहिल्यास त्यांनी साकारलेली भूमिका निश्चितच लक्षवेधी ठरते.
ग्रीक देवी एथेनाच्या भूमिकेत झेंडायाची निवड का करण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर या निवडीमागचे कारण स्पष्ट होते. ट्रोजन वॉरचे नेतृत्व करणाऱ्या आगामेमननचा भाऊ आणि स्पार्टाचा राजा मेलेनोसच्या भूमिकेत जॉन बर्नथल यांनी पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. हिमेश पटेल यांच्या बोलक्या डोळ्यांनी त्यांच्या अभिनयाला वेगळी उंची दिली आहे, तर कॅलिप्सोच्या भूमिकेत चार्लीज थेरॉन यांचा अभिनय थक्क करणारा आहे.
कलाकारांची ताकद, दिग्दर्शनाची भव्यता, तांत्रिक कौशल्य आणि लेखनातील जादू या सर्वांच्या जोरावर ‘द ओडिसी’ हा या वर्षातील सर्वांत शानदार सिनेमॅटिक अनुभवांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
चित्रपटातील सुरुवातीच्या काही बाबींमध्ये भाषा आणि उच्चार खटकू शकतात. कथानक ज्या काळात घडते, त्या काळाशी सुसंगत वाटण्याऐवजी चित्रपटातील भाषा आजच्या काळातील इंग्रजीसारखी जाणवते. मात्र, नंतर नोलन यांच्या दिग्दर्शनाची ताकद इतकी प्रभावी ठरते की या मर्यादांकडे प्रेक्षकांचे सहज दुर्लक्ष होते.
या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे ‘द ओडिसी’ पाहण्यासाठी प्रेक्षकांना होमर, ग्रीक पौराणिक कथा किंवा मूळ महाकाव्याचे सखोल ज्ञान असणे आवश्यक नाही. नोलन यांचे चित्रपट समजून घेण्यासाठी मोठ्या बौद्धिक तयारीची गरज असते, अशी सर्वसाधारण धारणा आहे. मात्र, यावेळी त्यांनी अशा कोणत्याही गुंतागुंतीच्या कोड्यांचा आधार घेतलेला नाही, ज्यामुळे प्रेक्षकांना हा अनुभव आपल्यासाठी नाही असे वाटेल.
‘द ओडिसी’ हा पूर्णपणे अनुभवावर आधारित चित्रपट आहे. एखाद्या प्रेक्षकाला चित्रपटातील काही बाबी खटकल्या तरी त्याचा भव्य अनुभव दीर्घकाळ स्मरणात राहतो. त्यामुळे इतरांची मतं जाणून घेण्यापेक्षा प्रेक्षकांनी स्वत: चित्रपटगृहात जाऊन या महाकाव्यात्मक सिनेमाचा अनुभव घ्यावा.