पहाटे थरार ...तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
नवी मुंबई
mumbai police मुंबईसह राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात धक्कादायक हत्या उघडकीस आली आहे. सेक्टर १५ येथील डी-मार्टजवळ गुरुवारी पहाटे एका ३० वर्षीय अज्ञात तरुणाची डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 

unknown youth brutally murdered near d mart in cbd belapur navi mumbai police investigate 
या हत्याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र, हत्या झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. तो नेमका कोण, कुठे राहणारा आहे आणि त्याचे नाव काय, याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत तरुण डी-मार्टसमोरील फुटपाथवर उभा असताना एक अज्ञात व्यक्ती तेथे आला. त्याने अचानक त्या तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तातडीने फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीची ओळख पटवणे आणि हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, त्यातून आरोपी किंवा मृत तरुणाबाबत महत्त्वाचा पुरावा मिळतो का, याकडे पोलिसांचे लक्ष आहे.“अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघांचीही ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, भरवस्तीत घडलेल्या या हत्येमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.