नवी दिल्ली
vikram 1 launch भारत अंतराळ क्षेत्रात आणखी एक मोठा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. शनिवारी 18 जुलै रोजी भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी महत्त्वाचा दिवस ठरणार असून, हैदराबादस्थित खासगी अंतराळ कंपनी स्कायरूट एअरोस्पेस आपल्या कक्षीय प्रक्षेपण वाहन ‘विक्रम-1’चे प्रक्षेपण करणार आहे. ‘आगमन’ असे या महत्त्वाकांक्षी मोहिमेला नाव देण्यात आले आहे. सकाळी 11.30 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून (SDSC-SHAR) हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या मोहिमेद्वारे प्रथमच एखादी भारतीय खासगी कंपनी स्वतः विकसित केलेल्या कक्षीय प्रक्षेपण वाहकाच्या माध्यमातून उपग्रहाला त्याच्या निश्चित कक्षेत स्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ही मोहीम भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे.
भारतीय अंतराळ विज्ञानाचे जनक आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे दूरदृष्टीचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटला ‘विक्रम-1’ असे नाव देण्यात आले आहे. सुमारे 24 मीटर लांबीचे हे प्रक्षेपण वाहन पूर्णपणे हलक्या कार्बन कॉम्पोझिटपासून तयार करण्यात आले आहे. विक्रम-1 रॉकेटमध्ये तीन घन इंधन टप्पे आणि एका द्रव इंधनाच्या सहाय्याने कार्य करणारे ऑर्बिटल ॲडजस्टमेंट मॉड्यूल आहे.
या प्रक्षेपण वाहनाची क्षमता सुमारे 350 किलो वजनाचा पेलोड पृथ्वीपासून 450 किलोमीटर उंचीवरील निम्नस्तरीय कक्षेत स्थापित करण्याची आहे. या मोहिमेतील ‘डायमंड लोटस’ नावाचा पेलोड बंगळुरूस्थित कॉसमॉस डायमंड्स या कंपनीने प्रयोगशाळेत तयार केला आहे.
यापूर्वी 2022 मध्ये स्कायरूट एअरोस्पेसने ‘विक्रम-S’ ही मोहीम यशस्वी केली होती. त्यानंतर ‘प्रारंभ’ या उपकक्षीय मोहिमेच्या यशानंतर कंपनीने आता ‘आगमन’ या नव्या मोहिमेच्या माध्यमातून कक्षीय प्रक्षेपण क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. कक्षीय प्रक्षेपण वाहकाच्या मदतीने उपग्रह अंतराळात पाठवण्याचा हा पहिलाच मोठा प्रयत्न आहे.
ही मोहीम यशस्वी झाल्यास भारताच्या व्यावसायिक अंतराळ क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते. खासगी कंपन्यांसाठी अंतराळ क्षेत्रातील नव्या संधी खुल्या होतील आणि व्यावसायिक प्रक्षेपण वाहन उद्योगाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. ‘विक्रम-1’चे प्रक्षेपण हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एका नव्या आणि महत्त्वपूर्ण पर्वाची सुरुवात मानली जात आहे.