वर्धा,
wardha सिंदी (मेघे) ग्रामपंचायतमध्ये स्वच्छ भारत मिशन सांडपाणी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. ई-निविदा रद्द असतानाही सरपंचाने ४४ लाख १५ हजार रुपयांचे बिल काढले असल्याचा आरोप जि. प.चे माजी सदस्य मनीष पुसाटे यांनी १७ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सिंदी (मेघे) ग्रामपंचायतला २०२२-२३ मध्ये स्वच्छ भारत मिशन सांडपाणी योजनेच्या कामासाठी २ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. नागरिकांच्या घरासमोरील चेंबर खचून सांडपाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी हे काम तात्काळ बंद करावे, अशी मागणी केली होती. संबंधितांनी कामाची पाहणी करून हे काम बंद केले. जिपच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या ३१ डिसेंबर २०२५ च्या पत्रानुसार या कामाची निविदा रद्द करण्यात आली होती, असे असतानाही ४४ लाख १५ हजार ४३३ रुपये ठेकेदारास वितरित करण्याचे आदेश देण्यात आले. गट विकास अधिकारी संजय पाटील यांनी २० नोव्हेंबर २०२३ च्या अहवालात सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे नमूद करून एकही रुपया देऊ नये, अशी शिफारस केली होती. चौकशी अहवालात सदर कामाची ई निविदा नियमबाह्य पद्धतीने झाली असून ५० लाख क्षमता असणार्या ठेकेदारास तब्बल २ कोटी ३१ लाख रुपयांचे काम दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या भ्रष्टाचाराची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावे, नकारात्मक अहवाल डावलून देयक अदा करणार्या दोषी अधिकारी व प्रशासक सरपंचावर फौजदारी गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे, ठेकेदारास दिलेले ४४ लाख रुपये व्याजासह वसूल करावे, निकृष्ट काम करणार्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देऊन केली असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला सुनिल देशमुख, रवी कांबळे, दिगांबर फलटणकर, रवींद्र दारुंडे आदींची उपस्थिती होती.या संदर्भात प्रशासक सरपंच सवाई यांच्यासोबत संपर्क केला असता स्वच्छ भारत मिशन सांडपाणी योजनेतील निविदा रद्द झाली नाही. तर जे काम पूर्ण झाले त्याचे पैसे दिले, अशी माहिती सरपंच तथा प्रशासक सवाई यांनी तरुण भारतसोबत बोलताना दिली.