दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लाच घेतांना खासगी इसमास रंगेहात अटक

कर्मचारी असल्याचे भासवून ४ हजारांची मागीतली लाच

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
वाशीम,
acb traps जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग विभागात कर्मचारी असल्याचे खोटे सांगून रुग्णांची फसवणूक करणार्‍या आणि दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी एका दिव्यांग व्यक्तीकडे लाचेची मागणी करणार्‍या एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सतीश बबन कवर रा. तामसी, ता. जि. वाशीम असे या लाचखोराचे नाव आहे.
 
 

washim acb traps private person taking rs 4000 bribe for disability certificate 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका ५६ वर्षीय दिव्यांग तक्रारदाराच्या ४१ टक्के अपंगत्व प्रमाणपत्राची मुदत संपली होती. त्यामुळे त्यांनी नवीन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नावे ऑनलाइन अर्ज करून पावती भरली होती. मात्र, हे प्रमाणपत्र देण्यासाठी अस्थिरोग कक्षात खासगी इसम सतीश कवर याने स्वतः रुग्णालयाचा कर्मचारी असल्याचे सांगून १० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष या प्रकरणाची पडताळणी केली. तडजोडीअंती खासगी इसम सतीश कवर हा ४ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रुग्णालय परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून लाचेची ४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने या खासगी इसमाला रंगेहात पकडले आणि त्याच्या मुसया आवळल्या.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशीमचे पोलिस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनात सापळा पथकातील पोलिस हवालदार विनोद मारकंडे,नितीन टवलारकर आणि पोलीस हवालदार योगेश खोटे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.