बोगस बियाणे प्रकरणी ९ बियाणे कंपन्याविरुद्ध जिल्ह्यात दहा ठिकाणी गुन्हे दाखल

शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा कृषी विभागाकडून ठपका

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
अकोला
bogus seed अकोला-जिल्ह्यात बोगस बियाणे प्रकरणी शनिवार, १८ रोजी कृषी विभागातर्फे धडक मोहीम राबवत नऊ कंपन्यांविरुद्ध जिल्ह्यात दहा ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.त्यामुळे कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. बोगस बियाण्यांमुळे काही दिवसांपासून शेतकरी, विविध राजकीय पक्ष,शेतकरी संघटना, व सामाजिक संघटना यांनी कठोर कार्यवाहीसाठी आंदोलनाचा पवित्र घेतला होता.अखेर कृषी विभागाकडून फौजदारी कारवाईसाठी धडक मोहीम राबविण्यात आली.
 
 
akola bogus seed case: cases filed against 9 seed companies for farmer fraud allegations
यंदा खरीप हंगामामध्ये सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.काही दिवसांपूर्वी तक्रारींचा आकडा हा १७२२ पर्यंत पोहोचला होता.त्यापैकी १८३बियाण्याचे नमुने हे तपासणीमध्ये फेल आढळून आले होते. संबंधित बियाणे कंपन्यांवर कार्यवाहीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर आंदोलन करण्यात आले होते.जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये बैठका देखील झाल्या. गत आठवड्यात रवी सीड, आणि बुस्टर या दोन कंपन्यांवर एमआयडीसी पोलीस स्टेशन व सिटी कोतवाली मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.दरम्यान शनिवारी सोयाबीन बियाणे उगवण तक्रारी संदर्भात कृषी विभागाने तेल्हारा ,अकोट बाळापुर, पातुर, मूर्तिजापूर, रामदास पेठ, अकोला,बार्शीटाकळी व बाळापूर या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी नोंदवल्या.
 
त्यानुसार सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.ही कार्यवाही सुनील बोरकर, संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण, प्रवीण देशमुख, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, कृषी आयुक्तालय पुणे यांच्या आदेशान्वये विभागीय कृषी सहसंचालक अमरावती गणेश घोरपडे, जिल्हाधिकारी वर्षा मीना,पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.मुरली इंगळे, कृषि उपसंचालक हरिष देशमुख, कृषि विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव, तंत्र अधिकारी,नितीन लोखंडे, मोहीम अधिकारी महेंद्र सालके, गुनियंत्रण निरीक्षक सतिश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कंपन्या विरोधात झाले गुन्हे दाखल
कृषी विभागाने विविध कंपन्यांच्या विरोधात जिल्ह्यातील १० पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले या कंपन्यांमध्ये ईगल सिड्स प्रायव्हेट लिमिटेड,( इंदोर), वीगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड (,इंदोर), दप्तरी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड (सेलू जिल्हा वर्धा), ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड (जिल्हा संभाजीनगर, )ऑस्कर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ( इंदोर), एशियर ऍग्रो जेनेटिक्स (खंडवा), ओसवाल सीड्स लिमिटेड, अंकुर सीड्स लिमिटेड( सोलापूर), बाफना सीड्स लिमिटेड (खरगोन मध्य प्रदेश) चा समावेश आहे.