गोंदिया,
zilla parishad schools गोंदिया विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी समग्र शिक्षण अभियान 2026-27 अंतर्गत 16 जिल्हा परिषद शाळांमध्ये 34 अतिरिक्त वर्गखोल्या उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी 5.27 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, शाळांच्या दुरुस्ती व सुधारणा कामांसाठी आणखी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारसंघासाठी एकूण 7.27 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार विनोद अग्रवाल यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांची भेट घेऊन मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमधील जीर्ण इमारती, वाढती विद्यार्थी संख्या आणि अतिरिक्त वर्गखोल्यांची निकड याकडे लक्ष वेधले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर गोंदिया मतदारसंघातील प्रस्तावांना प्राधान्य देण्यात आले असून, 16 शाळांमध्ये प्रत्येकी दोन अतिरिक्त वर्गखोल्यांना मंजुरी मिळाली आहे. या प्रस्तावांना केंद्र शासनाकडून अंतिम प्रशासकीय मान्यताही प्राप्त झाली आहे. या योजनेचा लाभ रतनारा, डांगोर्ली, कोचेवाही, मोगर्रा, हिवरा, वडेगाव, हलबीटोला, परसवाडा, कासा, देवरी, दतोरा, टांडा, रावणवाडी, सतोना, खामारी आणि तुमखेडा येथील जिल्हा परिषद शाळांना होणार आहे.
याबाबत आ. अग्रवाल म्हणाले की, शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा भक्कम पाया आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य असून, मतदारसंघातील कोणतीही शाळा मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. व या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांचे आभार मानले.