बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याचा वापर करून देशभर सायबर डल्ला

- तिरोडा पोलिसांसह तामिळनाडू, गुजरात, दिल्ली व हिमाचल प्रदेशात गुन्हे दाखल

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
cyber-heist : गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाइन सायबर फसवणूक आणि आर्थिक फसवणुकीचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले असून, या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) वर प्राप्त झालेल्या तक्रारी आणि एका संशयास्पद बँक खात्याच्या विश्लेषणावरून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी कायदेशीर तरतुदींनुसार 16 जुलै रोजी गुन्हा नोंद केला असून विविध पथकाद्वारे तपासाला सुरुवात केली आहे.
 

cyber-heist 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार तिरोडा पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांचा आढावा घेतला जात असताना, एनसीआरपी पोर्टलवर नोंदवलेल्या तक्रारींमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या खाते क्रमांक 60554133001 चा वापर संशयास्पद व्यवहारांसाठी केला गेल्याचे आढळून आले. तपासात समोर आले की, देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या ऑनलाइन फसवणुकीची रक्कम आधी या खात्यात जमा करून त्यानंतर ती इतर विविध खात्यांमध्ये वळवली जायची. प्राथमिक तपासाअंती, 23 ते 24 नोव्हेंबर 2025 या अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत या बँक खात्यात 94 हजार रुपयांची संशयास्पद रक्कम जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, एनसीआरपी पोर्टलवरील नोंदीनुसार, या एकाच बँक खात्याविरुद्ध देशातील वेगवेगळ्या राज्यांतून एकूण 4 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात तामिळनाडू राज्यात पहिली तक्रार दाखल असून यात 30 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे.
 
 
तर दिल्ली (स्पेशल सेल सायबर पोलिस स्टेशन) 25 हजार रुपये, गुजरात (वडोदरा सिटी सायबर क्राईम पोलिस ठाणे) 26 हजार रुपये, हिमाचल प्रदेश (बिलासपुर येथील झंडुता पोलिस ठाणे) 13 हजार रुपये असे एकूण 94 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे दिसून येत असून सदर रक्कम बँक ऑफ महाराष्ट्रच्या नमूद खात्यात जमा करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची रीतसर तक्रार पोलिस शिपाई धनंजय प्रभू बरई यांनी नोंदवली आहे. या हायप्रोफाइल सायबर गुन्ह्याचा तपास महिला पोलिस निरीक्षक प्रियांका बैस यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तिरोडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक या आंतरराज्य सायबर गुन्हेगारीच्या संपूर्ण नेटवर्कचा कसून शोध घेत असून, संबंधित बँक खात्यांचे बँक स्टेटमेंट आणि इतर व्यवहारांची बारकाईने पडताळणी केली जात आहे.