एक संघटित सेक्स रॅकेट: पोलिस
अमरावती,
blackmailing elite client येथील जुना बायपास मार्गावरील सामरा नगर भागात भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा राजापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला होता. आता या प्रकरणाच्या सखोल तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रॅकेटचे धागेदोरे केवळ वेश्याव्यवसायापुरते मर्यादित नसून उच्चभ्रू ग्राहकांना ब्लॅकमेल करण्याचा गंभीर प्रकारही उघड झाला आहे. हे एक संघटित सेक्स रॅकेट असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.
राजापेठ पोलिसांनी ८ जुलै रोजी एका रेसिडेन्सीमधील फ्लॅटवर धाड टाकून वेश्याव्यवसायाचा भंडाफोड केला होता. दोन जणांना अटक केली होती. तीन महिलांची सुटका करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती जे पुरावे लागले आहेत, ते अत्यंत गंभीर आहेत. आरोपी व्हाॅट्सॲप बिझनेसद्वारे ग्राहकांशी संपर्क साधून महिलांचे फोटो पाठवत असत आणि प्रतिमहिला सुमारे २,५०० रुपये दर निश्चित करत होते. आरोपींच्या मोबाईलमधील चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांच्या विश्लेषणातून काही उच्चभ्रू व्यक्ती तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचारी या धंद्यात ग्राहक म्हणून सहभागी असल्याचे दिसून आले आहे, तर काही ग्राहकांचे व्हिडिओ चित्रित करून त्यांचा गैरफायदा घेतला जात असल्याची बाबही प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
राजपेठचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी ही पाळेमुळे खणून काढली आहेत. सध्या या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींच्या सहभागाबद्दल आणि आर्थिक व्यवहारांच्या डिजिटल पुराव्यांचे सखोल विश्लेषण सुरू आहे. पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची छायाचित्रे सापडली असून, अनेक महिलांना या व्यवसायात गुंतवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रॅकेटचे जाळे केवळ जुना बायपास भागापुरते मर्यादित नसून साईनगर, देशमुख ले-आऊट आणि गोंडबाबा मंदिर परिसरातही हे रॅकेट सक्रिय होते. या संपूर्ण रॅकेटशी संबंधित इतर लोकांचाही पोलिस शोध घेत आहेत.
फरार आरोपीचा शोध सुरू
मुख्य आरोपी मंगला हिने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार विनोद सध्या फरार आहे. तो मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील एजंटमार्फत महिलांना अमरावतीत बोलावून हा व्यवसाय चालवत होता. विशेष म्हणजे, मंगला हिचा सख्खा भाऊही मंगलधाम परिसरात अशाच प्रकारे स्वतंत्र व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस आता या संपूर्ण साखळीचा शोध घेत आहेत.
भाड्याने जागा देताना सतर्क राहा
भाड्याने जागा देताना सतर्क राहा. घर किंवा फ्लॅट भाड्याने देताना संबंधित व्यक्तींची ओळख, कायदेशीर कागदपत्रे तपासणे आणि पोलिस पडताळणी करणे बंधनकारक आहे. परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. -संदीप चव्हाण
ठाणेदार, राजापेठ