पुलगाव,
candlelight-march : रोठा शिवारात शेतात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेने सर्वत्र रोष व्यक्त केला जात असतानाच रविवार १९ रोजी पुलगावात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नराधमाने तिचा दगडाने ठेचून खून केला. पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली. मात्र, ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याने सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी निडर नारी ग्रुपने मेणबत्ती निषेध मोर्चा काढला. नगर परिषद समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन या मोर्चाला सुरुवात झाली. पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, आरोपीचे वकीलपत्र वकिलांनी स्वीकारू नये, सरकारने उच्च दर्जाचा वरिष्ठ विशेष सरकारी वकील नेमावा, पोलिस प्रशासनाचा चौकशी अहवाल तत्काळ न्यायालयात सादर करावा, पीडित कुटुंबाचे शासनाने त्वरित पुनर्वसन करून शासनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात महिला, युवती व सामाजिक व राजकीय नेते सहभागी झाले होते.