निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरण
चांदूररेल्वे,
chandur railway तालुक्यात निकृष्ट व अप्रमाणित सोयाबीन बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची घटना २९ जून ते १७ जुलैदरम्यान घडली. प्रकरणी दोन सोयाबीन कंपन्यांविरुद्ध शुक्रवार, १७ जुलैला चांदूररेल्वे पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुस्टर प्लँट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड (गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना) आणि श्री सीड्स (जामली रोड, शिरपूर, जि. खंडवा, मध्य प्रदेश) या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे बनावट व निकृष्ट बियाणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कंपन्यांनी आपल्या सोयाबीन बियाणांच्या पाकिटांवर बेस्ट क्वाॅलिटी, गॅरंटीड, १०० टक्के सर्टिफिकेशन अशा आकर्षक व विश्वासार्ह दाव्यांची जाहिरात केली होती. या दाव्यांवर विश्वास ठेवून चांदूररेल्वे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. पेरणीनंतर शेतकऱ्यांनी खत, पाणी आणि आवश्यक मशागतही केली. मात्र, अनेक दिवस उलटूनही बियाणांची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकट त्यांच्या समोर उभे ठाकले आहे. सोयाबीन उगवले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी दाखल केल्या. चौकशीत बुस्टर प्लँट जेनेटिक्स कंपनीविरुद्ध तब्बल ७७ तक्रारी, तर श्री सीड्स कंपनीविरुद्ध १८ तक्रारी प्राप्त झाल्या. अशा एकूण ९५ शेतकऱ्यांनी निकृष्ट बियाणांमुळे नुकसान झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली आहे. फिर्यादी पंचायत समिती चांदूररेल्वेचे कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रवी राणे आहेत.
शेतकऱ्यांची नुकसानभरपाई व कारवाईची मागणी
या प्रकरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करून झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.