बुलढाणा,
district-central-cooperative-bank-election : दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रमास मान्यता दिली असून, २३ ऑगस्ट रोजी मतदान, तर २४ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी गौतम वर्धन यांनी १६ जुलै रोजी हा कार्यक्रम प्रसिद्ध केला. निवडणुकीची अधिसूचना २० जुलैला जारी होईल. त्याच दिवसापासून २४ जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. अर्जाची छाननी २५ जुलैला होणार असून, वैध अर्जाची यादी २७ जुलैला प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २७ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १४ ऑगस्टला अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. आवश्यकता भासल्यास २३ ऑगस्टला सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होईल. मतमोजणी २४ ऑगस्टला पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार असून, निवडणूक प्रक्रिया २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. संचालक मंडळात तालुकानिहाय १३ मतदारसंघांतून प्रत्येकी एक प्रतिनिधी निवडला जाणार आहे. याशिवाय महिला प्रतिनिधींसाठी दोन, अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय आणि विमुक्त जाती-भटया जमाती अथवा ओबीसीसाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे.