आर्वी,
arvi amravati आर्वी-देऊरवाडा-अमरावती या वर्दळीच्या राज्य महामार्गावर नांदपूर ते कर्माबाद दरम्यान एक विशाल वाळले झाड केव्हाही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महामार्ग वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांना जोडणारा मुख्य दुवा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. यामध्ये स्कूल बस, शासकीय आणि खाजगी प्रवासी वाहने, ट्रॅक्टर, व्यापार्यांची मालवाहू वाहने आणि दुचाकीस्वार याच मार्गाचा वापर करतात. मोठे शहर असलेल्या अमरावतीला आर्वी येथुन शिक्षणासह बाजारपेठेसाठी रोज जाणार्यांची संख्याही मोठी आहे. वाळलेले झाड डांबरी रस्त्याच्या कडेला आणि विजेच्या तारांच्या अगदी जवळ उभे आहे. त्याच्या फांद्या रस्त्यावर झुकलेल्या आहेत. एखादा दुचाकीस्वार किंवा वाहन जवळून जात असताना जोराचा वारा सुटल्यास किंवा पाऊस पडल्यास हे झाड कोसळून जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही. हे झाड कित्येक महिन्यांपासून याच स्थितीत उभे आहे. मात्र प्रशासनाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. या मार्गावरून प्रवास करणार्या अनेक वाहनधारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी हे वाळलेले झाड तत्काळ कापून टाकण्याची मागणी केली आहे. प्रशासन एखाद्या मोठ्या अनर्थाची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.