भोंदूबाबाची मालमत्ता जप्त

सक्तवसुली संचालनालयाची कारवाई

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
नाशिक,
ashok kharat भाविकांना कोट्यवधी रुपयांनी लुटणारा भोंदू बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टनची तब्बल ३६ कोटी ९० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली आहे. अंधश्रद्धेच्या बाजारातून गोळा केलेला हा काळा पैसा सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून मनी लॉंड्रींग करून पांढरा केल्याप्रकरणी ईडीच्या मुंबई झोनल ऑफिसने अशोक, त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह सहा जणांविरोधात विशेष न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.
 

ed attaches rs 36.90 crore property of fake godman ashok kharat in money laundering case 
 
 
 
भोंदू बाबा अशोक खरात याने आजार बरे करणे, संकट निवारण आणि व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून अवतार पूजेच्या नावाखाली भाविकांची फसवणूक केली होती. यातून मिळालेला पैसा त्याने नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे आणि मुंबई येथे नातेवाईकांच्या नावावर स्थावर मालमत्तेत गुंतवला होता, असे इडीच्या तपासात उघड झाले आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असून आपण भगवान शिवाचा अवतार असल्याचा दावा करून खरात भाविकांना फसवायचा. या भोंदू बाबाविरोधात नाशिकचे सरकारवाडा, तसेच शिर्डी, सिन्नर आणि राहता पोलिस ठाण्यात फसवणूक, खंडणी आणि धमकावल्याचे गुन्हे दाखल आहेत. ईडीने १५ जुलै रोजी १९.२० कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली तर यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात १७.७० कोटींचे बँक लॉकर्स, वाहने व इतर मालमत्ता गोठवली होती. ईडीने १९ मे रोजीच अशोक खरातला अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.