गोव्याच्या भाजप आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन!

ताळगाव मतदारसंघात शोककळा

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
पणजी,
jennifer-monserrate-passes-away : गोव्याच्या राजकारणातील एक प्रभावी आणि सक्रिय महिला चेहरा, ताळगाव मतदारसंघाच्या भाजप आमदार तसेच माजी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवारी (१९ जुलै २०२६) कर्करोगाने निधन झाले. त्या ५६ वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून गोव्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.
 
 
jennifer-monserrate-passes-away
 
 
 
सरपंच ते कॅबिनेट मंत्री: एक प्रभावी राजकीय प्रवास
 
 
२४ मार्च १९७० रोजी जन्मलेल्या जेनिफर मोन्सेरात यांनी २००५ मध्ये सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ताळगाव पंचायतीच्या सरपंचपदापासून केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा पंचायत सदस्य म्हणूनही काम पाहिले. २०१२ मध्ये त्या ताळगाव मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २०१७ आणि २०२२ अशा सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवत जनतेचे प्रतिनिधित्व केले. ताळगाव मतदारसंघातून निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या.
 
मुख्यमंत्री सावंत यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री
 
 
जुलै २०१९ मध्ये काँग्रेसच्या १० आमदारांसह त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला होता. भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी त्यांनी महसूल, माहिती-तंत्रज्ञान, कामगार आणि रोजगार यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली. प्रमोद सावंत यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळातील त्या एकमेव महिला मंत्री होत्या.
 
गोव्याच्या राजकारणातील 'पॉवर कपल'
 
 
जेनिफर मोन्सेरात या गोव्याचे विद्यमान महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार अतानासिओ (बाबूश) मोन्सेरात यांच्या पत्नी, तर पणजी महानगरपालिकेचे (सीसीपी) महापौर रोहित मोन्सेरात यांच्या मातोश्री होत. २०१२ पासून गोवा विधानसभेत एकाच वेळी सदस्य म्हणून कार्य करणारे पहिले पती-पत्नी दाम्पत्य म्हणून जेनिफर आणि बाबूश मोन्सेरात यांची नोंद झाली होती.
 
वाद आणि न्यायालयीन खटला
 
 
त्यांच्या राजकीय प्रवासादरम्यान २००८ मधील पणजी पोलीस स्थानक दगडफेक प्रकरणात अनेकांसह जेनिफर मोन्सेरात यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. हा खटला सध्या न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.
 
राज्यातून श्रद्धांजलीचा ओघ
 
 
गेल्या दशकभरात ताळगाव मतदारसंघाचा विकास आणि जनतेच्या प्रश्नांसाठी जेनिफर मोन्सेरात यांनी सातत्याने काम केले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.