जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये

खा. जैन यांच्या महसूल अधिकार्‍यांना सूचना: गोंदियात बैठक

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
gondia news राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातील प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत महसूल विभागाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी काटेकोर नियोजन करावे. शिबिराचा व्यापक प्रचार-प्रसार करून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना खासदार राजेंद्र जैन यांनी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.
 
 
gondia news
 
स्थानिक प्रशासकीय इमारत येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, तहसीलदार समशेर खान पठाण यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या वतीने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने तसेच तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
 
 
बैठकीत खासदार जैन यांनी संपूर्ण जिल्ह्यात शिबिरांचे प्रभावी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी गावागावांत जाऊन नागरिकांशी संपर्क साधावा, योजनांची माहिती द्यावी आणि पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. प्रसंगी बैठकीला जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे, नानू मुदलियार, माधुरी नासरे, राज शुक्ला, लोकेश यादव, रवि पटले आदी उपस्थित होते.