नवी दिल्ली,
shri ram mandir सर्वोच्च न्यायालय सोमवारी श्रीराम मंदिर देणगी अपहार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या चार याचिकांवर सुनावणी घेणार आहे. न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या एसआयटीकडून (विशेष तपास पथक) सद्यस्थिती अहवाल आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून यासंदर्भात उत्तर सादर करण्याचा निर्देश दिला आहे.
कथित अपहाराची निष्पक्ष आणि कालमर्यादेत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या चार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. २० जुलैच्या कार्यसूचीनुसार, सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना या प्रकरणाशी संबंधित चार स्वतंत्र याचिकांवर सुनावणी घेणार आहे. न्यायालयाने गेल्या सुनावणीत उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. सोमवारी एसआयटी आपला चौकशी अहवाल न्यायासनासमोर सादर करण्याची शक्यता आहे.
याचिकाकर्ते नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याशिवाय ट्रस्टच्या आर्थिक व्यवस्थापनाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक ऑडिट करण्याची मागणीही केली आहे. हिंदू धर्म परिषदेने दाखल केलेल्या आणखी एका याचिकेतही आरोपांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.