ऑल इज वेल’ उपक्रमाची शतकपूर्ती

सार्वजनिक विहिरीचा श्रीगणेशा जमनालाल बजाज सेवा ट्रस्टचा उपक्रम

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
वर्धा
all is well शेतकर्यांच्या जीवनात शाश्वत समृद्धी आणण्यासाठी सिंचनाची गरज आहे. सिंचन असल्यास वर्षातून तीन ते चार पिके घेऊन आर्थिक संपन्नता साधू शकतो, हे लक्षात घेऊन जमनालाल बजाज सेवा ट्रस्टच्या वतीने शेतकर्यांना विहीर खोदून देण्यासाठी ‘ऑल इज वेल’ उपक्रम हाती घेतला. बघता-बघता १०० विहिरींचा टप्पा गाठून पहिल्या सार्वजनिक विहिरीचा श्रीगणेशा केला. यातून शेतकर्यांसोबतच गाव जलसमृद्ध करण्याकडेही पाऊल टाकले आहे.
 

jamanalal bajaj seva trust completes 100 wells under all is well initiative in wardha 
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जमिनीत पाणी असून शेतकर्यांकडे विहीर खोदण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे अशा शेतकर्यांना पाठबळ देण्यासाठी जमनालाल बजाज सेवा ट्रस्टने पुढाकार घेतला. शेतात पाण्याची जागा शोधण्यापासून तर खोदकाम करुन देण्यापर्यंतची यंत्रणा उभी केली. याच यंत्रणेच्या माध्यमातून विहिरीचे खोदकाम करुन बांधकामाची जबाबदारी शेतकर्यांवर सोपविली. गेल्या दीड वर्षात १०० विहिरींचा टप्पा पूर्ण केला. यातूनच गावकर्यांचा पाणीप्रश्नही समोर आल्यानंतर तालुक्यातील गणेशपूर गावात पहिली सार्वजनिक विहीर लोकांच्या सेवेत आणली. नुकताच बजाज सेवा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भार्गव, सरपंच किरण शेळके, ग्रामविकास अधिकारी प्रेमानंद गावंडे, यांच्यासह संस्थेची संबंधित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व गावकर्यांच्या उपस्थितीत नव्या आरंभाचा सोहळा पार पडला.
गेल्या दीड वर्षापासून ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये विहीर खोदकामाच्या एकूण खर्चापैकी केवळ १० टक्के वाटा शेतकर्याला उचलावा लागतो, तर उर्वरित ९० टक्के रक्कमेचा भार संस्था स्वतः उचलते. संस्थेच्या या भक्कम आर्थिक पाठबळामुळे गरीब आणि गरजू शेतकर्यांच्या कोरड्या शेतात आज पाण्याचे स्त्रोत निर्माण झाले आहे. या उपक्रमामुळे लाभधारक शेतकर्यांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडून आले आहेत. वर्षभर सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यामुळे शेतकर्यांना आता पारंपरिक पिकांशिवाय नगदी व बहुविध पिके घेणे सहज शक्य झाले आहे.
आमची एक खाजगी संस्था असून केवळ लोककल्याणाच्या उद्देशाने काम करीत आहोत. जानकीदेवी बजाज या ८० वर्षांपूर्वी विहिरींसाठी निधी गोळा करायच्या आणि तो निधी गावकर्यांना द्यायच्या. हेच काम आम्ही करत असून आतापर्यंत १०० विहिरी पूर्ण झाल्या आहेत. आम्ही शेतकर्यांसोबतच आता गावकर्यांची पाणीसमस्या सोडविण्यासाठीही पुढाकार घेतला असल्याचे मत जमनालाल बजाज सेवा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भार्गव यांनी व्यक्त केले.
v