हैदराबाद,
molestation-of-a-little-girl : येथील जिआगुडा भागात एका ९ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग केल्याच्या संशयावरून संतप्त स्थानिक जमावाने एका ५० वर्षीय चहा विक्रेत्याची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कुलसूमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अब्दुल अझीझ असे आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे पसरला संताप
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल अझीझ हा परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय करत होता. गुरुवारी दुपारी दुचाकीवर बसलेल्या एका ९ वर्षांच्या मुलीला त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार एका शेजाऱ्याच्या निदर्शनास आल्यानंतर अझीझने तिथून पळ काढला. मात्र, ही सर्व घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. हे फुटेज स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचताच परिसरात प्रचंड संताप निर्माण झाला आणि जमावाने त्याला गाठून जबर मारहाण केली.
उपचारादरम्यान मृत्यू आणि पोलिसांचा तपास
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या अझीझला जमावाच्या ताब्यातून सोडवले. त्याला उपचारासाठी तातडीने उस्मानिया सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणात आता संशयिताच्या आईने पोलिसांत उलट तक्रार दाखल केली असून, जमावाने केलेल्या बेदम मारहाणीमुळेच आपल्या मुलाचा जीव गेल्याचा आरोप केला आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारहाण करणाऱ्यांचा आणि या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.