हवामान विभागाचा इशारा, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
मुंबई
weather alert  राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून जुलै महिन्याच्या सुरुवातीला सर्वदूर झालेल्या चांगल्या पावसानंतर पुन्हा एकदा पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. रखडलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी या पावसाच्या जोरावर पूर्ण केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा सुरू असतानाच आता भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा मोठा इशारा दिला आहे.
 

maharashtra weather alert: imd issues yellow alert for heavy rain in several districts 
मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, नागपूर, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असून या भागांसाठी भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, बीड, पुणे, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा कायम आहे. सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून रात्रीच्या वेळीही काही भागांत पावसाची नोंद झाली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मंगरूळपीर आणि कारंजा weather alert  तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर जिल्ह्यातील काही भागांत रिमझिम सरी कोसळल्या.गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खरीप पिकांना या पावसाने नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पिकांच्या वाढीस मोठी मदत होणार असून शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.परभणी जिल्ह्यात दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानंतर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसू लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले दुबार पेरणीचे संकट तूर्तास टळले आहे. २० जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पावसाने सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून त्यामुळे खरीप हंगामाला मोठा आधार मिळणार आहे.