अनिल कांबळे
नागपूर,
married woman suicide हुंड्याच्या मागणीवरून होणारा शारीरिक व मानसिक छळ तसेच कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून ३१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पिंकी आशिष झा (३१) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या श्यामनगर, पारडी येथील रहिवासी होत्या. त्यांचा विवाह सुमारे ११ वर्षांपूर्वी आशिष झा (३१) याच्याशी झाला होता.
या दाम्पत्याला दोन मुले आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये सासरे मधुकांत झा (६५) आणि इंद्रासन झा (६०) यांचा समावेश आहे. तिघेही श्यामनगर, पारडी येथील रहिवासी आहेत. पिंकी यांचा भाऊ राजीवकुमार मोहन पाठक (३८), रा. दिल्ली यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, लग्नानंतरपासूनच पती व सासरच्या मंडळींकडून हुंड्याच्या मागणीवरून पिंकी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचा आरोप आहे. आशिष याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. तसेच पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावर संशय married woman suicide घेतला जात असल्याने पिंकी मानसिक तणावात होत्या, असेही तक्रारीत नमूद आहे. सततच्या छळाला कंटाळून पिंकी यांनी १४ जुलै रोजी सकाळी श्यामनगर येथील घरात स्वतःला कोंडून घेत सल्फासच्या गोळ्या सेवन केल्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, चौकशीनंतर भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पारडी पोलिसांनी पती व सासू-सासऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८५, ११५(२), ३५१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.