नागपूर,
nagpur weekly markets शहरातील आठवडी बाजारांमध्ये नियोजनाचा अभाव आणि अस्वच्छतेची समस्या गंभीर झाली आहे. बाजार संपल्यानंतर सडलेला भाजीपाला, खराब-सडकी फळे आणि कचर्याचे ढीग रस्त्यांवरच सोडून दिले जातात. यामुळे दुर्गंधी, चिखल आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
नागपूर शहरात जवळपास ५६ ठिकाणी अनधिकृत रीत्या आठवडी बाजार भरतो. पावसाळ्यात रात्री बाजार उठल्यानंतर शिल्लक भाजीपाला व घाणेरडे पाणी परिसरात फेकून विक्रेते मोकळे होतात. त्यामुळे बाजारात चिखलासह सडलेल्या भाज्यांची दुर्गंधी येते. त्यामुळे बाजार परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील अनेक भागातील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. जवळपास हजारावर विक्रेते कापड टाकून किंवा रस्त्यावरच दुकाने थाटतात. शहरात प्रामुख्याने अजनी-रामेश्वरी भागात सोमवारी, बेसा-बेलतरोडी भागात बेलतरोडी चौकात सोमवारी, महाल व सक्करदरा येथे बुधवारी, राजीव नगर-जयप्रकाशनगर येथे शनिवारी व जयताळा येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. तेथे ताजी भाजी मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, बाजार बंद होताच तेथील शिल्लक कचर्याने तसेच कुजलेल्या-सडलेल्या भाजीपाल्याच्या दुर्गंधीने परिसरात राहणारे नागरिक त्रस्त होतात. बाजारातील कचर्याचे वाढते ढीग, अस्वच्छता, मोकाट जनावरे, श्वान-डुकरांचा सुळसुळाट, पावसामुळे ओला होऊन सडलेला भाजीपाला, त्यामुळे पसरणारी दुर्गंधी हे चित्र नेहमीचेच झाले आहे. पावसाळ्यात तर चिखलाचे साम्राज्य असते. ग्राहकांच्या रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ऑटोवाले रस्त्यातच थांबतात. त्यामुळे आठवडी बाजारातून मार्ग काढणे म्हणजे मोठी कसरतच असते.
उघड्यावर पडलेला कचरा आणि सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून आजार पसरण्याचा धोका वाढतो.
ज्या भागात बाजार भरतात तेथे हमखास वाहनकोंडी होते. नागरिकांना वाट काढण्यासाठी आटापिटा करावा लागतो. हाती पिशवी घेऊन रस्त्यावर फिरणार्या ग्राहकांची मोठी गर्दी असते. हॉर्न वाजवूनही ते बाजूला होत नाहीत.
कचरा उचलण्याचे नियोजन नाही
काही मोजक्या बाजारांचा अपवाद वगळता बहुतांश आठवडी बाजारातील कचरा अथवा सडका भाजीपाला उचलण्याचे नियोजन महापालिकेकडून वेळेत होत नाही. तसेच बाजारातील वाहतूक कोंडी अपघातास कारणीभूत ठरू शकते. तरीही वाहतूक पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेतात.नागपूर शहरात १२ अधिकृत आठवडी बाजार असून ५६ अनधिकृत बाजार असल्याची माहिती आहे