नवीन इमारतीमुळे न्यायालयाचे कामकाज अधिक गतिमान व सुलभ होईल : न्या. अनिल किलोर

अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
मंगरुळनाथ
mangrulnath आधुनिक पायाभूत सुविधांनी युक्त नवीन न्यायालयीन इमारतीमुळे न्यायालयाचे कामकाज अधिक गतिमान व सुलभ होईल आणि पक्षकारांना जलद न्याय मिळण्यास मोठी मदत होईल, असे मत न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी व्यक्त केले.
 

new additional sessions court building foundation laid at mangrulnath 
येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन व कोनशीला समारंभ १८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धेश्वर ठोंबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशीमचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश प्रथम जे. पी. झपाटे, सागर मुंगिलवार, पंकज नायगावकर, के. सी. कलाल, एस. डी. तारे, पी. व्हि राणे, एस. एस. सहस्त्रबुद्धे, ए. आर. फक्राबदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यायमूर्ती सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी सुसज्ज न्यायालयीन इमारतींचे महत्त्व अधोरेखित करत, ही इमारत वकील, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक सुविधाजनक ठरेल, असे सांगितले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम म्हणाले नवीन इमारतीमुळे जिल्ह्यातील न्यायदान प्रक्रियेला नवी दिशा व गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष राजेश्वर पांडे यांनी नवीन इमारतीमुळे वकिलांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होऊन कामकाजासाठी सुसज्ज व सन्मानजनक वातावरण उपलब्ध होईल, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत तसेच बंजारा समाजाच्या पारंपरिक लोकनृत्याने झाली. सामाजिक बांधिलकी जपत वाशीम जिल्ह्यातील सर्व न्यायाधीशांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले. तसेच मंगरुळनाथ विधीज्ञ मंडळाच्या वतीने गरजू नागरिकांना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आमदार श्याम खोडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, सा. बा. विभागाचे आवारी, चेके, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर, पोलिस निरीक्षक शेळके, मुख्य अभियंता सुषमा बोंद्रे, उपमुख्य वास्तूशास्त्रज्ञ कविता बी. रंगारी, सा. बा. विभागाचे अधिक्षक अभियंता सुनिल थोटांगे, कार्यकारी अभियंता यू. एस. बिरारीस, उपाध्यक्ष जिल्हा विधीज्ञ मंडळ तिफने, सचिव वैभव बेलोकार, अधिवक्ता बी. एम. ठाकरे, अधिवक्ता मनोज येवले, अधिवक्ता निकीता सावंत प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा न्यायाधीश प्रथम तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रज्ञा काळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, वकील, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानले.
..................