‘पवित्र पोर्टल’मुळे भावी गुरूजींचा जीव टांगणीला!

जाहिराती नोंदविण्याच्या मुदतीचा उद्या शेवटचा दिवस

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
pavitra portal शिक्षक भरतीअंतर्गत शाळा व्यवस्थापनांना रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर नोंदवण्यासाठी शासनाने आता चौथ्यांदा 20 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 638 शिक्षकांची भरती प्रक्रिया सध्या रखडली असून पवित्र पोर्टलच्या तारीख पे तारीखमुळे भावी गुरूजी त्रस्त झाले आहे. दिलेली मुदत सोमवारी संपूष्टात येणार असताना त्यात पुन्हा मुदतवाढ करून तारीख तर मिळणार नाही. या टेंशनमुळे भावी गुरुजींचा जीव टांगणीला लागला आहे.
 
 
pavitra portal
 
शिक्षकांची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 2025 च्या भरती प्रक्रियेला मे महिन्यापासून प्रारंभ करण्यात आला होता. याअंतर्गत जाहिराती नोंदवण्यासाठी सुरुवातीला 31 मे ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक संस्थांना जाहिरात देण्यासाठी आणखी कालावधी हवा असल्याने ही मुदत आधी 15 जून आणि त्यानंतर 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली. 30 जूननंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, असे सांगितले जात असतानाच, शासनाने 10 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपताच पुन्हा चौथ्यांदा 20 जुलैपर्यंत अंतिम तारीख वाढवण्यात आली. वारंवार मिळणार्‍या या मुदतवाढीमुळे प्रत्यक्ष भरती प्रक्रियेकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा वाढली आहे. वारंवार मिळणार्‍या या मुदतवाढीमुळे पवित्र पोर्टलवरील जागांचा आकडा वाढणार की फक्त उमेदवारांच्या पदरी निराशाच पडणार? हे 20 जुलैची डेडलाईन संपल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. एकीकडे डी.टी.एड, टी.ई.टी परीक्षा देऊन पदरी पडलेल्या गुणांच्या जोरावर नोकरी मिळवण्यासाठी तरुण रात्रंदिवस देव पाण्यात घालून बसले असताना दुसरीकडे संस्थाचालकांना जाहिराती देण्यासाठी ‘रेड कार्पेट’ अंथरले जात आहेत. आता या चौथ्या मुदतवाढीच्या काळात आणखी किती नवीन जागांची भर पडते, की आहे त्या 638 जागांवरच समाधान मानावे लागते, हे सोमवारनंतर म्हणजेच, 20 जुलैची डेडलाईन संपल्यावरच स्पष्ट होणार आहे.
 
  
शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत पोर्टलवर जाहिरात नोंदवण्यासाठी यापूर्वी 10 जुलैपर्यंत मुदत होती. शासनाने ही मुदत वाढवून 20 जुलै पर्यंत केली आहे. आपल्या जिल्ह्यातील नोंदणी प्रक्रिया झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील बिंदू नामावली प्रक्रिया रखडल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
- पवन खंडारे, शिक्षणाधिकार, प्राथमिक, गोंदिया