बुलढाणा,
plastic-free-rajur-ghat : शहराजवळील राजूर घाटाचे निसर्गसौंदर्य मनमोहक आणि अलौकिक असल्याने दररोज सकाळी व सायंकाळी अनेक निसर्गप्रेमी व नागरिक येथे भेट देतात. मात्र, घाट परिसरात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, चिप्सची पाकिटे व इतर प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात विख रलेला असल्याने या नैसर्गिक सौंदर्याला गालबोट लागत आहे.

याची दखल घेत पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने शनिवारी प्लास्टिकमुक्त राजूर घाट हा स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या अभियानात घाट परिसरातील रस्त्याच्या कडेला पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक पाकिटे व अन्य कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच नागरिकांनी पर्यटनस्थळी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि कचरा विखुरू नये, असा संदेशही यावेळी देण्यात आला. या उपक्रमात कल्पना माने, प्रदीप डांगे, डॉ. विधी राठी, प्रा. सुरेश जमधाडे, शुभांगी भोंडे, अनिता कापरे, सार्थक डांगे आणि संस्कृती भोंडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरण संरक्षणासाठी अशा सामाजिक उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास निश्चितच मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.