सायबर चोरट्यांकडून सव्वादोन कोटींची फसवणूक

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
पुणे,
pune cyber fraud सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत पुण्यातील नागरिकांची दोन कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 

pune cyber fraud cases cross 2.25 crore as scammers target investors and senior citizens 
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सिंहगड रस्ता परिसरातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तरुणाने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले होते. तरुणाला पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात तरुणाने वेळोवेळी ५२ लाख रुपये जमा केले. चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी येरवडा भागातील एका ज्येष्ठ महिलेची ५५ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ज्येष्ठ महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वडगाव शेरी भागातील एका तरुणाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ६८ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
‘‘डिजिटल ॲरेस्ट’ची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक
 
 
लखनौतील गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी लष्कर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची ५० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. पोलिस अधिकारी असल्याचे चोरट्यांनी त्यांना सांगितले. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या पत्नीला अटकेची (डिजिटल ॲरेस्ट) भीती दाखविली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने शहानिशा न करता चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पोलिस उपनिरीक्षक शरद शेळके तपास करत आहेत.
---चौकट
आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक
आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची ४६ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.
सायबर चोरट्यांनी समाज माध्यमात एक जाहिरात प्रसारित केली होती. आभासी चलन, परदेशी चलन व्यवहारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी पैसे जमा केले. त्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक सपना देवतळे तपास करत आहेत.