रिलायन्स एडीएशी संबंधित कंपन्यांवर छापे

सीबीआयची दिल्ली व मुंबईत कारवाई

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
मुंबई,
reliance ada रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडविरुद्ध दाखल प्रकरणात सीबीआयने शनिवारी दिल्ली आणि मुंबईतील १५ ठिकाणी झाडाझडती घेतली. ही प्रकरणे बँकेच्या निधीच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहेत. या झडतीमुळे अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स एडीए ग्रुपच्या तपासाला वेग आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
 
reliance ada
 
सीबीआयच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, या झडतीमध्ये ग्रुपच्या २३ परस्परसंबंधित कंपन्यांचा समावेश होता़ ज्या सर्व मुंबई आणि दिल्ली या दोन प्रमुख शहरांमध्ये आहेत. बँकेचा निधी वळवण्यासाठी या परस्परसंबंधित कंपन्यांचा वापर केला गेला. आरसीएफएल आणि आरएचएफएलने हा निधी कर्ज म्हणून घेतला आणि नंतर तो रिलायन्स एडीए ग्रुपच्या इतर कंपन्यांना हस्तांतरित केला़ त्यामुळे कर्ज देणाऱ्या बँकांचे अवाजवी नुकसान झाले. मुंबईतील विशेष न्यायालयाकडून वॉरंट मिळाल्यानंतर ही झडती मोहीम राबवण्यात आली.
 
बँकेच्या निधीचा गैरवापर केल्याचा आराेप
सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम), आरएचएफएल, आरसीएफएल आणि रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड (आरटीएल) यांच्या विरोधात सात एफआयआर दाखल केले आहेत. विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे हे एफआयआर दाखल झाले आहेत. या तक्रारींमध्ये कंपन्यांवर बँकेच्या निधीचा गैरवापर केल्याचा आणि कर्ज देणाऱ्या संस्थांना आर्थिक नुकसान पोहोचवल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणा या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करत आहे.