जम्मू,
jammu and kashmir रविवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असून, अचानक आलेला पूर, भूस्खलन आणि घरे कोसळल्याने आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि सहा जण बेपत्ता आहेत. शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हवामान खात्याने 23 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथ यात्रा, माता वैष्णो देवी यात्रा आणि शिवखोडी यात्रा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत.
पूंछला सर्वाधिक फटका, अनेक गावे प्रभावित
पूंछ जिल्ह्यातील सुरानकोट आणि हवेली परिसरात सर्वाधिक नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर सुरानकोटच्या लोअर मुर्रा गावातील एक घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. दोन जणांचे मृतदेह सापडले असून, महिला आणि मुलांसह इतर सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव पथके शोधकार्य सुरू ठेवत आहेत.
नुनाबंदी गावात घर कोसळून 28 वर्षीय नाझिया कौसर यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती आणि तीन लहान मुले जखमी झाली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगलेयानी गावात घर कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला. मारहोट परिसरात, वेगाने वाहणाऱ्या नाल्यात एक अल्पवयीन मुलगी वाहून गेली. धुंधक लाथुंग पुलाजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेहही सापडला. हवेली परिसरात घर कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली.
स्थानिक वृत्तानुसार, पूंछ शहरातील पुलस्त्या नदीला आलेल्या पुरामुळे दोन दुकाने, एक पिठाची गिरणी आणि एक वाहन दुरुस्ती केंद्र वाहून गेले असून, अनेक वाहने पाण्याखाली गेली आहेत. भूस्खलनामुळे जिल्ह्यातील बहुतेक रस्ते बंद झाले असून, वीजपुरवठा आणि बीएसएनएल व एअरटेल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत.