रसुलाबादच्या जि.प. शाळेत रानभाजी महोत्सव

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
वर्धा,
wild-vegetable-festival : रसुलाबाद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये आनंददायी शनिवार एनसीडी क्लब, ग्रामपंचायत, स्टेप्स इंडिया प्रोजेक्ट यांच्या संयुक्त वतीने वाकेथॉन व रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसह ४०० पेक्षा जास्त लोकांनी या महोत्सवाचा लाभ घेतला.
 
 

JK 
 
 
 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच राजेश सावरकर, एनसीडी क्लबचे अध्यक्ष राजू मानकर, पोलिस पाटील श्याम काकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील उपस्थित होते.
 
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
 
 
आधुनिक काळात फास्ट फूड व जंक फूडचा वापर वाढला असून रानभाज्यांचा वापर खूप कमी झाला आहे. तसेच वापरण्यात येणारा भाजीपाला फवारणीचा आहे. एकप्रकारे विषयुक्त भाज्यांचे सेवन आपण नियमित करत आहो. आपण रानभाज्यांचे सेवन केले तर अनेक आजारांना आळा बसू शकतो. त्यामुळे रानभाज्यांचे सेवन करणे गरजेचे आहे, हे सांगणारा आगळा वेगळा उपक्रम स्टेप्स इंडिया प्रोजेक्टच्या वतीने राबविण्यात आला.
 
या महोत्सवात विद्याथ्र्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या आणून त्याचे महत्त्व समजावून सांगितले. कटुले, तरोटा, आंबाडी, तांदुळजना (चवळी), राजगिरा, मटारू, चिव, सुरण, पाथरी, कडीपत्ता, पुदिना, शेपू, धोत्रा, घोळ, राजगिरा, कुंद्रा, काटेमाठ, पुनर्नवा, गोफन, शेवगा अशा अनेक प्रकारच्या रानभाज्यांनी हा महोत्सव सजला होता. तसेच औषधी वनस्पती आणि तेलबियाचा समावेश करून त्यांचा परिचयही करून देण्यात आला.
 
 
संचालन सेवाग्राम रुग्णालय एनसीडीचे विजय कोल्हे आणि सुनील लोहे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नागरगोजे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रापं सदस्य, आरोग्य उपकेंद्र, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळा व्यवस्थापन समिती, बचतगट, सी. आर. पी. विवो व गावकर्यांची उपस्थिती होती.