अमरावती,
uddhav thackeray शिवसेनाप्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून स्वतःच्या सत्तेच्या स्वार्थासाठी औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्यांशी हातमिळवणी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना सन्मती आणि सद्बुद्धी व्हावी यासाठी अमरावती भाजपाच्या वतीने राजकमल चौकात सुंदरकांड पठन करण्यात आले. कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे पाटील, आ. राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, किरण पातुरकर, तुषार भारतीय, नितीन गुडधे, चेतन पवार, चेतन गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

आज, शनिवारी दुपारी अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपाने सुंदर कांडचे पठन केले. डाॅ. अनिल बोंडे यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विसर पडला. औरंगजेब आणि टिपू सुलतान त्यांचे हिरो बनले होते. त्यांच्या कार्यकाळात पालघरमध्ये साधूंची हत्या झाली. लॉकडाऊनच्या नावाखाली मंदिरांना कुलुपे ठोकण्यात आली. आता सत्ता गेल्यावर आणि स्वतःचा पक्ष खिळखिळा झाल्यावर त्यांना पुन्हा रामाची आठवण आलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पाठ म्हणणे तर सोडा, नीट वाचून तरी दाखवली पाहिजे. त्यांना रामरक्षा वाचता देखील येत नाही आणि जगाचे नियंत्रण करणाऱ्या रामाची रक्षा करायला हे दुबळे लोक निघाले, याचे आश्चर्य वाटते, असे डॉ. अनिल बोंडे म्हणाले.
आमदार प्रवीण पोटे म्हणाले, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. कारसेवेतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. तेव्हा उद्धव ठाकरे घरात बसून शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना शिवसेनेतून कसे काढायचे याचे कारस्थान करीत बसले होते. त्यांच्या तोंडी रामाचे नाव शोभत नसल्याचेही प्रवीण पोटे म्हणाले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी म्हणाले की, श्रीराम एकवचनी होते. त्यांनी पित्याला दिलेले वचन १४ वर्षांचा वनवास सहन करून निभावले. उद्धव ठाकरे यांची अवस्था केविलवाणी आहे. सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्व सोडले आणि हिंदुत्वविरोधकांशी घरठाव केला. श्रीराम मंदिराच्या देणगीला त्यांनी खंडणी म्हटले. श्रीराम ललाच्या प्रतिष्ठापनेवर बहिष्कार टाकला. श्रीराम मंदिरावर टीका केली. हिंदुत्व विरोधकांशी घरठाव केला. त्या उद्धव ठाकरेंना रामरक्षा म्हणण्याचा अधिकार नसल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले. उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी श्रीरामाचा जयघोष करून उद्धव ठाकरे यांना सन्मती आणि सद्बुद्धी मिळावी यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली.