अनिल कांबळे,
नागपूर,
robbery-murder-of-auto-driver : कॅटरिंगचे काम आटोपून सहकाऱ्यांसह मध्यरात्री घरी परतणाऱ्या ऑटोचालकाला ७ ते ८ दरोडेखोरांनी मारहाण केली. ऑटोचालकाचे तीन हजार रुपये लुटल्यानंतर त्याचा तलवारीने भोसकून खून केला. गोरेवाडा-पिटेसूर मार्गावरील हनुमान मंदिर टी-पॉइंटजवळ शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. त्यात एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाचाही समावेश आहे. मोहम्मद काशिद मोहम्मद रफीकभाई (३५) असे खून झालेल्या ऑटोचालकाचे नाव आहे.
मो. काशिद हे कॅटरिंगचे काम संपवून सहकाऱ्यांसह मोमिनपुऱ्याकडे ऑटोने परतत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने त्यांना अडवले. दरोडेखोरांनी ऑटोतील लोकांवर हल्ला करून लूटमार सुरू केली. काशिद यांनी विरोध केला असता आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील मोबाइल व तीन हजार रुपये लुटले. मारहाणीत काशिद गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे रात्रीचे गस्ती पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृताच्या सहकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
काही मिनिटांपूर्वी डिलिव्हरी बॉयलाही सुटले
याच टोळीने या घटनेच्या काही मिनिटांपूर्वी गोरेवाडा-पिटेसूर मार्गावर स्विगी डिलिव्हरी बॉय निखिल मोरेश्वर चौधरी (२६) यालाही अडवून मारहाण केली होती. आरोपींनी त्याच्याकडील एक हजार रुपये लुटले होते. त्यामुळे ही टोळी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून लूटमार करत होती.
पोलिसांच्या गस्तीमुळे आरोपींची घेराबंदी
घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या विशेष रात्रीच्या गस्ती पथकातील उपनिरीक्षक भगवान कोळी घटनास्थळी पोहोचले. जखमीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर नियंत्रण कक्षाला सतर्क करण्यात आले. त्यानंतर शहरातील सर्व पेट्रोलिंग पथके, बीट मार्शल आणि गुन्हे शाखेच्या पथकांना आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. मानकापूरचे बीट मार्शल सिद्धार्थ मंडपे आणि होमगार्ड जॅकी साळुंके यांनी सर्वप्रथम मुख्य आरोपी यश ऊर्फ गणपत गावंडे (२२) याला पकडले. त्यानंतर नवीन उईके (२८) याला अटक करण्यात आली. दोघांची चौकशी केल्यानंतर समीर ऊर्फ पाजी उईके (१९), सुलभ ऊर्फ राज ठाकूर (२६), संजय ऊर्फ निलेश जोगी (३०), रोहित जगदाळे (२६) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे.
थेट पोलिस आयुक्त घटनास्थळावर
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे, विनीता साहू, पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल, राहुल मदने, मानकापूर पोलिस, बीट मार्शल आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने काही तासांतच आरोपींना जेरबंद केले. आरोपींच्या तातडीने झालेल्या अटकेबद्दल पोलिस आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.