गोंदिया,
robbery plot hatched using a water bottle पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करत ट्रक चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून बेदम मारहाण करत त्याचे हात-पाय बांधून तब्बल 30 टनांहून अधिक तांदळाने भरलेला ट्रक चार अज्ञात दारोडेखोरांनी लंपास केल्याची थरारक घटना रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरी बसस्थानक परिसरात शुक्रवारी 17 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या धाडसी दरोड्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक नवीन श्रीरामचंद्र मौर्य (35) रा. हनुमानगंज, कतवारपूर, ता. फूलपूर, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश हे ट्रकमधून मध्यप्रदेशातील चाकघाट येथून सुमारे 30 टन 575 किलो तांदूळ घेऊन सडक अर्जुनीकडे निघाले असता शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सावरी बसस्टॉपजवळ ट्रक उभा करून विश्रांती घेत असताना एका अनोळखी व्यक्तीने ट्रकजवळ येऊन पिण्यासाठी पाणी मागितले. त्यांनी त्याला पाण्याची बाटली देत ट्रक सुरु करत असताना आरोपीने अचानक चाकूने ट्रकच्या दरवाजावर वार केला. यावेळी त्यांचे हात दरवाज्यावर असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दुसर्या आरोपीने दुसर्या बाजूचा दरवाजा उघडून केबिनमध्ये प्रवेश केला आणि मौर्य यांना खाली खेचून मारहाण सुरू केली. याचवेळी आणखी दोन आरोपींनी त्या ठिकाणी येत चौघांनी मिळून मौर्य यांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर त्यांचे हात-पाय झाडाला बांधून चाराही आरोपींनी तांदळाने भरलेला ट्रक घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेनंतर जखमी चालक मौर्य यांनी रावणवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी चारही आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर धागेदोर्यांच्या आधारे अज्ञात चारही दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.