तुरळक पावसाने केले वातावरण गार

नागपूरच्या कमाल तापमानात घट

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
नागपूर,
scattered rain cooled the atmosphere उकाडा, दमट हवामानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आषाढ सरींने दिलासा दिला. गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून अखेर शुक्रवारी रिमझिम करीत बरसला. शनिवारी पुन्हा कमाल तापमानात घसरण होऊन वातावरण आल्हाददायक झाले. मुसळधार पावसाची गरज असताना तुरळक पावसाने वातावरण गार केले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला असून पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे.
 
 
scattered rain cooled the atmosphere
 
मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला; मात्र त्यानंतर अल-निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची गती मंदावली. पावसाची गरज असताना पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असताना तुरळक पावसाने दिलासा दिला. दमदार पावसाचे दिवस असताना रिमझिम पावसावर समाधान मानावे लागत आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे वातावरणात अचानक बदल दिसून येत आहे.
 
 
पावसामुळे २४ तासांत नागपूरच्या कमाल तापमानात घट होऊन पारा २८.६ अंश सेल्सिअसवर आला आहे. रिमझिम पावसामुळे सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात ०.४ मिमी पावसाची नोंद केली. सोमवार, १९ जुलैला शहर आणि जिल्ह्यात हलका पाऊस पडेल. २० आणि २१ जुलैला सर्वसाधारणपणे ढगाळ हवामान राहील. २२ आणि २३ जुलैला हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने सूचित केले आहे की, या कालावधीत शहराचे कमाल तापमान सुमारे ३३-३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे २४ अंश सेल्सिअस राहील.
 
दुबार पेरणीचे संकट टळले
काही भागात समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामाला वेग मिळाला असून सध्या तरी दुबार पेरणीचे संकट टळल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास खरीप उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.