वर्धा,
ramdas-tadas : रोठा येथील अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार व निघृर्ण खुन प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींवर पोक्सो कायद्यासह कठोर कलमांखाली प्रभावी कारवाई करून प्रकरणाचा निष्पक्ष व जलद तपास करण्यात यावा, तसेच आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळण्यासाठी शासनाने प्रभावी प्रयत्न करावे, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्र्यांना सादर निवेदनातून केली आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास पारदर्शक व वेगाने पूर्ण करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, शासनाने वरिष्ठ विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी आणि पीडित कुटुंबाला आर्थिक, कायदेशीर व मानसिक अशा सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी रामदास तडस यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा अमानुष व मानवतेला काळीमा फासणार्या गुन्ह्यांना आळा बसावा, यासाठी शासनाने या प्रकरणात अत्यंत कठोर भूमिका घेऊन दोषींवर कायद्यानुसार कडक कारवाई करणे गरज आहे. न्यायव्यवस्थेवर समाजाचा विश्वास कायम राहण्यासाठी या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे आवश्यक असल्याचेही माजी खासदार रामदास तडस यांनी निवेदनात म्हटले आहे.