लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध; गर्भपात प्रकरणातील आरोपीला जामीन

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
crime-news : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला नागपूरच्या फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय तथा पोक्सो न्यायालयाने जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय कुलकर्णी यांनी हा आदेश दिला.
 
 
JLK
 
सूरज राऊत याच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलिस ठाण्यात पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. बचाव पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपी आणि पीडित तरुणीचे प्रेमसंबंध होते. आरोपीने लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर जून २०२५ पासून तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही अनेक वेळा असे संबंध झाले. जून २०२६ मध्ये तरुणीने गर्भधारणा चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. ही माहिती तिने आरोपीला दिल्यानंतर आरोपीने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी गर्भपातासाठी औषधे दिल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 
 
 
आरोपीला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला. पीडित तरुणी सज्ञान असून तिने स्वतःहून गर्भपातासाठी औषधे घेतल्याचेही सांगण्यात आले. आरोपीकडून आता कोणतीही जप्ती किंवा वसुली बाकी नसल्याने त्याची पुढील कोठडी आवश्यक नसल्याचा युक्तिवाद ॲड. प्रणीत वैरागडे यांनी केला.
 
 
न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना, पीडितेच्या संमतीविरुद्ध गर्भपात केल्याचा आरोप प्रथमदर्शनी सिद्ध होत नसल्याचे नमूद केले. तसेच गर्भपात डॉक्टर व पीडितेच्या पालकांच्या संमतीने झाल्याचे रिमांड अर्जातून स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले. लग्नाचे खोटे आश्वासन दिले होते की नाही, याचा निर्णय खटल्याच्या सुनावणीदरम्यान होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले असून तपासातील महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर न्यायालयाने सूरज राऊत याला ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या एक किंवा अधिक जामीनदारांच्या अटीवर जामीन मंजूर केला.