
sixth-sense मानवाकडेही सहा इंद्रिय असतात का, हा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र शास्त्रज्ञांच्या नव्या संशोधनानुसार सहावे इंद्रिय म्हणजे कोणतीही गूढ किंवा अलौकिक शक्ती नसून, शरीरातील अंतर्गत बदल ओळखण्याची क्षमता म्हणजेच ‘इंटरोसेप्शन’ आहे. ही क्षमता मानसिक आरोग्य, भावना नियंत्रित करणे आणि तणावाच्या काळात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, असे ऑक्सफोर्डच्या संशोधकांनी केल्या अभ्यासात समोर आले. प्राण्यांमध्ये भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा इतर नैसर्गिक संकटांची चाहूल आधीच लागते, अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. पक्षी, साप किंवा कुत्रे काही अदृश्य संकेत ओळखू शकतात, म्हणून त्यांच्यामध्ये सहावे इंद्रिय आहे, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडे अत्यंत विकसित जैविक संवेदन प्रणाली असते, जी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, ध्वनी किंवा विद्युत संकेत ओळखू शकते.
sixth-sense संशोधकांच्या मते, ज्या व्यक्तींना आपल्या शरीरातील अंतर्गत संकेत अधिक अचूकपणे जाणवतात, त्या आपल्या भावनांवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकतात. उलट ही क्षमता कमी झाल्यास चिंता, नैराश्य, खाण्याचे विकार आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांसारख्या मानसिक समस्यांचा धोका वाढू शकतो. नवीन संशोधनानुसार, ही संवेदना केवळ शारीरिक गरजा ओळखत नाही, तर व्यक्तीचा आत्मविश्वास, भावनिक संतुलन आणि तणावपूर्ण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही प्रभाव टाकते.
सर्व शास्त्रज्ञ सहमत नाहीत
sixth-sense ‘इंटरोसेप्शन’ ही संकल्पना सर्वांनीच स्वीकारलेली नाही. काही संशोधकांच्या मते, शरीरातील विविध संवेदन प्रक्रिया एकत्र करून ‘इंटरोसेप्शन’ हा व्यापक शब्द वापरला जातो. २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात, इंटरोसेप्शन अशी स्वतंत्र एकच संवेदना अस्तित्वात नाही, असा दावा करण्यात आला आहे. या संकल्पनेचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे असल्याचे त्यात नमूद करण्यात आले. भविष्यात चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक विकारांवर अधिक प्रभावी उपचार विकसित करण्यासाठी या संशोधनाची महत्त्वाची भूमिका असू शकते.