नवी दिल्ली,
sonam wangchuk सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक हे २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या अनिश्चितकालीन उपोषणामुळे प्रकृती खालावल्यानंतर सध्या सफदरजंग रुग्णालयात दाखल आहेत. आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी शनिवारी त्यांना रुग्णालयात हलवले. दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांच्या शरीरात डिहायड्रेशनची लक्षणे आढळून आली असली, तरी त्यांनी कोणतेही वैद्यकीय उपचार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

रविवारी सकाळी ८.३० वाजता सफदरजंग रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या वैद्यकीय माहितीनुसार, वांगचुक यांच्यावर व्हीएमएमसी आणि सफदरजंग रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. त्यांचा रक्तदाब, नाडी, ऑक्सिजन सॅच्युरेशन यांसारखे महत्त्वाचे शारीरिक मापदंड सध्या स्थिर आहेत. मात्र, रक्ताच्या तपासणीत काही बदल आढळले असून, सलग २१ दिवसांच्या उपोषणामुळे शरीरावर मोठा ताण आला आहे. त्यामुळे त्यांना बहु-शाखीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सातत्याने उपचारांची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी रात्री रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनातही वांगचुक पूर्णपणे शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले. त्यांचा रक्तदाब आणि नाडी सामान्य असली, तरी डिहायड्रेशनची स्पष्ट लक्षणे दिसत असल्याने तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करणे गरजेचे असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
दिल्लीतील एम्समधील एका स्वतंत्र तज्ज्ञानेही वांगचुक यांची तपासणी करून उपचार करणाऱ्या पथकाच्या निष्कर्षाशी सहमती दर्शवली आहे. त्यांच्या मते, वांगचुक यांना त्वरित इंट्राव्हेनस द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट थेरपीची गरज आहे. एम्समधील एक डॉक्टरही उपचार पथकात सहभागी झाला असून तो पुढील वैद्यकीय व्यवस्थापनावर लक्ष ठेवणार आहे. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, उपचार पथक आणि स्वतंत्र तज्ज्ञांनी वारंवार समजावून सांगूनही वांगचुक यांनी इंट्राव्हेनस फ्लुइड्स, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आणि सर्व औषधे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबीयांनीही अद्याप डॉक्टरांनी सुचवलेल्या उपचारांना संमती दिलेली नाही.
वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनीही कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली आहे. कुटुंबीय आणि वांगचुक यांच्यावर दीर्घकाळ उपचार करणाऱ्या त्यांच्या खाजगी डॉक्टरांची अधिकृत संमती मिळाल्याशिवाय तोंडावाटे किंवा इंट्राव्हेनस कोणताही उपचार सुरू करू नये, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे उपचार प्रक्रियेवरून सध्या तिढा निर्माण झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे. यापूर्वी न्यायालयाने प्रशासनाला वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज सखोल वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. उपोषणाच्या २१व्या दिवशी प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, नीट (NEET) परीक्षेशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA)चे आणखी तीन कार्यकर्ते २८ जूनपासून अनिश्चितकालीन उपोषणावर आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पार्टी (CJP) करत असून, कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून रुग्णालयात हलवल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. शांततेने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप करत त्यांनी याला लोकशाही हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले. दुसरीकडे, डॉक्टरांचे पथक वांगचुक आणि त्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर उपचार स्वीकारण्यासाठी सातत्याने समजावून सांगत आहे.