वडिल बस वाहक, लेक होणार डॉक्टर!

खुशीने नीटच्या परीक्षेत ५९३ गुण मिळवत उजळले गावाचे नाव

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
आजनसरा
khushi thool स्वप्नं मोठी असतील तर परिस्थिती आडवी येत नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिंगणघाट तालुक्यातील टाकळी निधा गावची कन्या खुशी गंगाधर थूल. वडील राज्य परिवहन महामंडळाच्या हिंगणघाट आगारात वाहक म्हणून सेवा देत आहेत. मर्यादित पगारात संसाराचा गाडा चालवत असतानाही त्यांनी मुलीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला कधी खीळ घातली नाही आणि आज त्याच खुशीने नीट यूजी २०२६ च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून संपूर्ण तालुक्याचे नाव उंचावले आहे.
 

st bus conductor 
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी एनटीएने १६ जुलैला जाहीर केलेल्या निकालात खुशीला ७२० पैकी ५९३ गुण मिळाले आहेत. तिचे एकूण पर्सेंटाईल ९९.३६ आहे. ऑल इंडिया रँक १२२५२, एससी कॅटेगरी रँक २७० बायोलॉजी ९९.८९ पर्सेंटाईल, फिजिक्स ९८.८५, केमिस्ट्री ९८.४२, एससी कॅटेगरीत २७० वा रँक असल्याने तिला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश मिळण्याची वाट मोकळी झाली आहे. खुशीचे वडील गंगाधर थूल गेली २० वर्षे हिंगणघाट आगारात वाहक म्हणून सेवा देत आहेत. ते भावूक होऊन म्हणाले, मी दिवसभर एसटीत तिकीट कापतो. पण, माझी लेक लोकांचे जीव वाचवणार आहे. तिच्यासाठी जे-जे करता आले ते केले. आज तिचा रिझल्ट बघून वाटतंय सगळा शीण दूर झाला. आई जयश्री यांनी घर सांभाळून खुशीला अभ्यासासाठी पूर्ण वेळ दिला.
गोरगरीबांची सेवा हेच ध्येय : खुशी
बाबा लोकांना एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवतात. मला लोकांना बरे करायचे आहे. माझ्या गावातील, तालुक्यातील गोरगरीब रुग्णांची सेवा करणे हेच माझे ध्येय आहे. या यशाचे श्रेय आई-वडील आणि माझ्या शिक्षकांना जाते. टाकळी (निधा) गावात आज आनंदाचे वातावरण आहे. मर्यादित साधनांमधूनही जिद्दीने यश मिळवता येते, हे खुशीने दाखवून दिले आहे.