शिक्षण वाऱ्यावर शिक्षक दारोदार

मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती थांबवा शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
वर्धा,

voter list  वर्धा मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेसाठी वर्ग सुरू असतानाच शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषत: गोरगरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिक्षक दारोदारी फिरत असून विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पोलिस विभागाप्रमाणेच शिक्षक कर्मचाऱ्यांनाही अशैक्षणिक कामांपासून वगळण्यात यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आ. नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री तसेच शिक्षण विभागाकडे निवेदनाद्बारे केली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष अजय वानखेडे यांनी दिली.
 

 voter list  
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाविरुद्ध सेंट मर्सी स्कूल या प्रकरणात ६ डिसेंबर २००७ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची निवडणुकीसंदर्भातील कामांसाठी नियुक्ती शक्यतो सुटीच्या दिवशी, अध्यापन नसलेल्या दिवशी किंवा शाळेच्या वेळेनंतरच करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, हा होता. मात्र, प्रत्यक्षात राज्यातील शिक्षकांना वर्ग सुरू असतानाच मतदार यादी पुनरीक्षणाचे काम सोपविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर कामात अडचणी आल्यास संबंधित शिक्षकांवर एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोपही शिक्षक परिषदेने केला आहे. त्यामुळे शिक्षकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांतील शिक्षकांना अध्यापनाचे काम बाजूला ठेवून मतदार यादी पुनरीक्षणासाठी दारोदारी जाऊन माहिती संकलित करण्यास भाग पाडले जात आहे.शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर अन् शिक्षकांना दारोदारी भटकण्यास भाग पाडू नये, अशी मागणी अजय वानखेडे यांनी केली आहे.