लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
teachers जयपूरमधील ९ वर्षांच्या अमायराच्या आत्महत्येची हृदयद्रावक घटना आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आणि समाजावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करते. एका चिमुकलीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले, कारण तिला शाळेत होणाऱ्या छळाला सामोरे जावे लागले आणि तिच्या तक्रारींकडे शिक्षकांनी दुर्लक्ष केले. ही घटना दुर्दैवी तर आहेच त्याचबरोबर आपल्या मुलांना सुरक्षित आणि भावनिक आधार देण्यास आपण कुठे कमी पडत आहोत, याचा आरसा आहे. या घटनेने पुन्हा एकदा हा विचार करायला लावला आहे की, शिक्षकांनी केवळ ज्ञानदाते न राहता, विद्यार्थ्यांसाठी पालकांसारखे आधारस्तंभ बनणे किती महत्त्वाचे आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत शिक्षणाला नेहमीच अत्यंत पवित्र मानले गेले आहे. गुरुकुल परंपरेत गुरु हे केवळ शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांचे पालक, मार्गदर्शक आणि मित्रही होते. विद्यार्थी गुरुकुलात राहून शिक्षण घेत असत आणि गुरु त्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर जीवन जगण्याची कला प्रदान करत, नैतिक मूल्यांची त्यांचे जीवन भरून टाकत आणि त्याजोडीला सामाजिक जबाबदाऱ्याही शिकवत असत. गुरु-शिष्याचे नाते हे केवळ औपचारिक नव्हते, तर ते प्रेम, विश्वास आणि आदरावर आधारित होते. गुरु आपल्या शिष्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवत असत आणि शिष्याच्या प्रत्येक अडचणीत त्याच्या पाठीशी उभे राहत असत.
आजच्या शिक्षण व्यवस्थेत मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शाळांची संख्या वाढली आहे, आधुनिक सुविधांनी युक्त इमारती उभ्या राहिल्या आहेत, पण मुलांच्या मनात सुरक्षिततेची भावना कमी झाली आहे. शिक्षकांवर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आणि परीक्षांचे निकाल सुधारण्याचा दबाव इतका वाढला आहे की, त्यांना विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. परिणामी, शाळा हे केवळ माहिती मिळवण्याचे ठिकाण बनले आहे, भावनिक आधाराचे नाही.
अमायराच्या घटनेत असे समोर आले की, तिने अनेकदा तिच्यावर होणाऱ्या छळाबद्दल शिक्षकांना सांगितले होते, पण तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही काय फक्त अमायराची गोष्ट नाही. अनेक शाळांमध्ये मुलांना होणाऱ्या त्रासाकडे, विशेषतः मानसिक छळाकडे, गांभीर्याने पाहिले जात नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात.
एका शिक्षकाला अनेक विद्यार्थ्यांची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे कठीण होते. काही शिक्षकांमध्ये मुलांच्या भावनिक गरजा समजून घेण्याची संवेदनशीलता नसते किंवा त्यांना तसे प्रशिक्षण मिळालेले नसते. त्यांना वाटते की, मुलांच्या लहानसहान तक्रारींकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे. पण मला एक गोष्ट कल नाही की एखादी स्त्री मुलीच्या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष कशी करू शकते? ती आई नाही का? नसली तरी बाई नाही का? मातृसुलभ हृदय तिच्याकडे नाही का?
शिक्षक आणि पालक यांच्यात योग्य संवाद नसल्यामुळे मुलांच्या समस्या वेळीच लक्षात येत नाहीत. त्यामुळे हा संवाद वाढणं आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीवेळा शालेय प्रशासन अशा गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करते, ज्यामुळे शिक्षकांनाही यावर कारवाई करण्याची प्रेरणा मिळत नाही. मागे एका हॉस्टेलमध्ये काही सिनियर मुलं खान मुलांना गुंडांसारखे मारत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता तर शिक्षक होमवर्क म्हणून कलमा देऊ लागले आहेत. शाळेच्या प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शैक्षणिक पात्रतेसह कॅरेक्टर सर्टिफिकेतही शिक्षकांकडून घेतलं पाहिजे.
लक्षात घ्या, पूर्वीही मुलांमध्ये चिडवाचिडवी, भांडणे होत असत, पण त्याचे स्वरूप इतके गंभीर नव्हते. आता मात्र सायबरबुलिंग, मानसिक छळ आणि शारीरिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. लहान मुले मोठ्या माणसांसारखी वागू लागली आहेत, त्यांच्यात संयमाचा अभाव दिसतो आहे आणि त्यांना आपल्या कृतींचे परिणाम समजत नाहीत. सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेत मोठे बदल झाले आहेत. त्यांना पटकन राग येतो, ते निराश होतात आणि अनेकदा चुकीचे निर्णय घेतात. या गंभीर परिस्थितीत शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम शिकवणारे यंत्र बनून न राहता, विद्यार्थ्यांसाठी पालकांसारखे बनणे ही काळाची गरज आहे. याचा अर्थ असा नाही की, शिक्षकांनी पालकांची जागा घ्यावी, तर याचा अर्थ असा आहे की, त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधला पाहिजे. मुलांना त्यांच्या समस्या, भीती आणि चिंता शिक्षकांसोबत शेअर करता येतील असा विश्वास त्यांना दिला पाहिजे. शिक्षकांनी मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले पाहिजे आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षकांनी मुलांच्या भावनांबद्दल संवेदनशील असले पाहिजे. एखाद्या मुलाला त्रास होत असेल, तर त्याला सहानुभूती दाखवून मदत केली पाहिजे. प्रत्येक मुलाची पार्श्वभूमी, मनःस्थिती आणि परिस्थिती वेगळी असते, हे शिक्षकांनी लक्षात ठेवले पाहिजे.
शाळेत होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बुलिंग किंवा छळाविरुद्ध शिक्षकांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे. अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता, त्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. मुलांना सुरक्षित वातावरणाची हमी दिली पाहिजे. शिक्षकांनी पालकांशी नियमित संपर्क साधला पाहिजे. मुलांच्या प्रगतीबद्दल, त्यांच्या वर्तणुकीतील बदलांबद्दल आणि त्यांच्या समस्यांबद्दल पालकांशी चर्चा केली पाहिजे. शिक्षक आणि पालक यांच्यातील समन्वयामुळे मुलांच्या समस्या वेळीच सोडवता येतात. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, शिक्षकांनी मुलांना नैतिक मूल्ये, सामाजिक जबाबदाऱ्या आणि जीवन कौशल्ये शिकवली पाहिजेत. त्यांना इतरांचा आदर करायला, सहानुभूती दाखवायला आणि समस्या सोडवायला शिकवले पाहिजे. शिक्षकांना मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि बुलिंगसारख्या समस्यांना कसे हाताळावे याबद्दल योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांना समुपदेशनाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
अमायरासारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपण सर्वांनी, विशेषतः शिक्षकांनी आणि शालेय प्रशासनाने, गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. शाळा हे मुलांसाठी दुसरे घर असले पाहिजे, जिथे त्यांना सुरक्षित, प्रेमळ आणि आधार देणारे वातावरण मिळेल. शिक्षकांनी केवळ ज्ञानदाते न राहता, विद्यार्थ्यांसाठी पालकत्वाचा आधार द्यावा. त्यांच्या मनात विश्वासाची ज्योत पेटवावी, जेणेकरून कोणतीही अमायरा पुन्हा कधीही एकटेपणाने आपले जीवन संपवण्याचा विचार करणार नाही.