वर्षभरात एकाच कुटुंबातील तीन वाघ अडकले

दहशतखोर वाघीण जेरबंद!

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
समुद्रपूर,
terror tiger तालुक्यातील पिंपळगाव, उंदीरगाव, साखरा, जोगिनगुफा या गावांमध्ये वाघिणीने दहशत निर्माण करून आतापर्यंत अनेक जणावरांना ठार केले. या वाघिणीची दहशत लक्षात घेऊन आ. समीर कुणावार यांच्या सुचनेवरून उपवनसंरक्षक हरविर सिंग, सहाय्यक वनसंरक्षक हरीष सरोदे यांनी या वाघिणीला पकडण्याची परवानगी मिळवली. वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांच्या नेतृत्वात वन्यजीव बचाव केंद्र, गोंदिया येथील एनएनटीआरची चमू तसेच वनविभागाच्या वतीने शिवणफळ बिटामध्ये सर्च मोहीम राबवून १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता कक्ष क्रमांक ३१९ मध्ये वाघिणीला पिंजर्यात अडकविण्यात मोठे यश मिळाले. विशेष म्हणजे, ही वाघीण गिरडच्या राणी टीएफ-१ चा बछडा आहे.
 

terror tiger tigress captured in samudrapur after creating panic in villages 
गेल्या काही दिवसांपासून वाघिणीने गिरड परिसरातील पाच गावांमध्ये दहशत निर्माण करून काही जनावरांना ठार तर काहींना जखमी केले होते. यामुळे या वाघिणीला पकडण्याची मागणी करण्यात येत होती. परिस्थिती लक्षात घेऊन उपवनसंरक्षक हरविर सिंग, साहाय्यक वनसंरक्षक हरीष सरोदे यांनी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवताच वाघिणीला पकडण्याची परवानगी मिळाली. वनविभागाने वाघिणीला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते. या वाघिणीला पकडण्यासाठी वापरलेल्या एका जनावराला ठार करताच वनविभागाची चमू अॅक्शन मोडवर आली आणि शेवटी वनविभागाच्या चमूला यश मिळाले. वाघिणीला पिंजर्यात टाकून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी गिरड परिसरात राणी वाघिणीने चार पिलांना जन्म दिला होता. यातील एकाचा धोंडगावजवळ अपघाती मृत्यू झाला तर दोन बछड्यांना वनविभागाच्या वतीने जेरबंद करण्यात आले होते. त्यावेळी या तिसर्या बछड्याला सुद्धा जेरबंद करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, या वाघिणीचा कोणतीही त्रास नसल्याने त्यावेळी पकडण्यात आले नव्हते. मात्र, ही वाघीण २ वर्षाची होताच खुर्सापार जंगल सोडून गिरड परिसरात जनावरांना ठार करण्याचा सपाटा सुरू केला होता. शेवटी वनविभागाच्या चमूला अवघ्या काही २४ तासांतच जेरबंद करण्यात यश मिळाले.
ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक हरविर सिंग, साहाय्यक वनसंरक्षक हरीष सरोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे, वर्धा येथील वन्यजीव बचाव केंद्र, मानद वन्यजीव रक्षक कौस्तुभ गावंडे, अभिषेक खेडुलकर, गोंदिया येथील एनएनटीआरची चमू, शुटर आशिष रामटेके, डॉ. मेघराज तुलावी, प्रणित सूर, भीमाशंकर तेली, क्षेत्रसहाय्यक जी. पी. राऊत, वनरक्षक पी. डी. बेले, वनरक्षक रमेश चौके, वनरक्षक कामतवार, कोंडबा गुंडप्पा, अमोल पिसे, वनरक्षक पटले, वनमजूर, टिआरपीची चमू यांनी केली.