चांदूरबाजार,
the impact of the bjps agitation राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ वरील हैदतपूर–वडाळा टोलनाक्यापासून २५ कि.मी. परिसरातील स्थानिक नागरिकांना टोल शुल्कात सवलत देण्याच्या मागणीसाठी तसेच रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलनाक्याची वसुली बंद करावी या मागणीसाठी तालुका भाजपाच्या वतीने शनिवार, १८ जुलैला टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत समाधानकारक तोडगा न निघाल्याने आक्रमक पवित्रा घेत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अखेर तहसीलदार योगेश गाडे व ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात आला व टोलनाका तात्पुरता बंद करण्यात आला. पुढील आदेश येईपर्यंत टोल वसुली बंद राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

यानंतर तहसीलदारांमार्फत आंदोलन करताना, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व तालुका भाजपा अध्यक्ष रमेश तायवाडे व जिल्हा उपाध्यक्ष मुरली माकोडे यांनी केले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान टोल प्रशासनाशी अनेकदा चर्चा झाली. मात्र, वरिष्ठांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने टोल बंद करून आंदोलन शांत करण्यात आले.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर सुने, हर्षल धुळे, अमर मोहोड, नीलेश देशमुख, अजिंक्य चुनडे, गौरव अर्डक, अनिकेत पिसे, सत्यजित ठाकरे, संदीप वाढवी, शेख मोसिमी, शेख अमित, अजय उटाडे, सागर शिरभाते, पंकज वरठी, दीक्षित खाजोने, संजय खेडकर, सोनू कांडलकर, अतुल दारोकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
अमरावती येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रवीण तायडे यांनी टोलचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा होईपर्यंत परिसरातील नागरिकांकडून टोल वसुली करू नये, असे निर्देश दिल्याची तसेच आता हा टोल नाका तात्पुरता बंद करण्यात आला असून पुढील चर्चा होऊन आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष मुरली माकोडे यांनी दिली. दुपारी दोननंतर याच ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलनही करण्यात आले. २५ जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २६ जुलैला उग्र आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी प्रहारसह विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.